लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत ठाण्यातील सर्वच आठवडी बाजार बंद केले होते. ते अद्यापही सुरू झालेले नाहीत. या बाजारांतून सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तू मिळत होत्या; परंतु येथे होणारी गर्दी पाहता कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर हे बाजार बंद केले होते. ते अद्यापही बंदच आहेत. जोपर्यंत कोरोना पूर्णपणे आटोक्यात येत नाही, तोपर्यंत ते सुरू होणार नसल्याचे सांगितले जात असले तरी या आठवडी बाजारांना लोकप्रतिनिधींचादेखील विरोध असल्याने त्यांनीही ते भरले जाऊ नयेत यासाठी महासभेत आवाज उठविला आहे.
ठाण्यातील सर्वसामान्यांचा ओळखल्या जाणाऱ्या आठवडी बाजार १४ वर्षांनंतर कोरोनामुळे बंद करण्यात पालिकेला यश आले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या आधी हे बाजार पुन्हा शहराच्या विविध भागात भरले जात होते; परंतु या बाजारांवर कारवाई करण्याची मागणी मागील वर्षी झालेल्या महासभेत लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार यावर कारवाई करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले होते. मात्र, जशी कोर्टात तारीख पे तारीख सुरू असते तसेच काहीसे आठवडी बाजारांचे सुद्धा झाल्याचे दिसत होते. वारंवार कारवाई केल्यानंतरही पुन्हा ते भरतात कसे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला होता. यामध्ये काही आर्थिक हितसंबंध असल्यानेच ते बंद करण्याचे धाडस दाखविले जात नसल्याची टीकाही झाली होती. रहदारीला होत असलेला अडथळा, महिलांची छेडछाड, सोनसाखळी चोरीच्या वाढत्या प्रकारांमुळे ते बंद करण्याची मागणी पुढे आली होती. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या
अतिक्रमण विभागाने शहरातील विविध भागांत भरणाऱ्या या बाजारांवर कारवाई करून ते कायमचे बंद केले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा भरू लागल्याचे चित्र दिसून आले. एकूणच वारंवार कारवाईची मागणी करूनही ते सुरूच असल्याचे दिसत होते.
दरम्यान, कोरोनाची पहिली लाट मागील वर्षी मार्च महिन्यात आली. त्यानंतर झालेल्या लॉकडाऊनमध्ये या बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी ते बंद केले. त्यानंतर आजही ते बंदच आहेत. या बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने ते आजही बंद आहेत. ते केव्हा सुरू होणार याची माहिती महापालिकेने तूर्तास दिलेली नाही; परंतु जोपर्यंत कोरोना पूर्णपणे आटोक्यात येत नाही, तोपर्यंत ते भरविले जाणार नसल्याची माहिती महापालिकेने दिली.
या ठिकाणी भरत होते आठवडी बाजार
माजिवडा - मानपाडा प्रभाग समिती- मंगळवार - ढोकाळीनाका, बुधवार - आझादनगर, गुरुवार - कासारवडवली, शुक्रवार - पातलीपाडा, शनिवार - मनोरमानगर, सोमवार- मानपाडा.
वागळे प्रभाग समिती- बुधवार - किसनगर,
रायलादेवी प्रभाग समिती - मंगळवार - इंदिरानगर
कळवा प्रभाग समिती - सोमवार - विटावा, मंगळवा - भास्करनगर, बुधवार - कळवा, खारेगाव, घोलाईनगर, शुक्रवार - खारेगाव, रविवार - खारेगाव.