सरनाईकांच्या पारड्यात अजितदादांचे वजन?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 12:45 AM2019-12-26T00:45:36+5:302019-12-26T00:45:59+5:30
एकनाथ शिंदे यांचा रवींद्र फाटकांकरिता आग्रह : जितेंद्र आव्हाडांना थोरल्या पवारांचा आधार
ठाणे : राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात ठाण्यातून कुणाकुणाची वर्णी लागणार, याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. तीन पक्षांचे सरकार असल्याने मोजकीच मंत्रीपदे वाट्याला येणार असल्याने मंत्रिमंडळात समावेशाकरिता स्वपक्षाबरोबर मित्रपक्षाच्या माध्यमातूनही लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा, याकरिता अजित पवार हेच आग्रही असल्याची चर्चा आहे, तर एकनाथ शिंदे हे रवींद्र फाटक यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश व्हावा, याकरिता प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराकरिता आता ३० डिसेंबरचा मुहूर्त अंतिम करण्यात आल्याची माहिती आहे. विद्यमान मंत्र्यांपैकी काहींनी माध्यमांना तशी माहिती दिली आहे. ठाण्यातील सरनाईक यांना मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान मिळावे म्हणून अजित पवार यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शब्द टाकल्याचे बोलले जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे हे आपल्या मर्जीतील रवींद्र फाटक यांच्या गळ्यात राज्यमंत्रीपदाची माळ पडावी, याकरिता प्रयत्नशील असल्याचे समजते.
शिवसेनेत राज्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असताना सलग तीनवेळा निवडून आलेले राष्टÑवादीचे मुंब्रा-कळव्याचे आ. जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार किंवा कसे, याबाबतही तर्कवितर्क केले जात आहेत. अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर, ठाण्यात आव्हाड समर्थकांनी अजितदादांविरोधात आंदोलन केले होते. ही बाब अजितदादा यांना रुचलेली नाही. त्यामुळे आव्हाड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाच्या मार्गात तेच खोडा घालण्याची शक्यता काही दादासमर्थक व्यक्त करीत आहेत, तर आव्हाड यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास किंवा अल्पसंख्याक कल्याण विभागाचा कार्यभार सोपवला जाईल, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे.
शरद पवार यांच्या संघर्षाच्या काळात आव्हाडांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाला सावरण्याचे काम केले आहे. शरद पवार यांचे ते खंदे समर्थक आहेत. धाकटे पवार जरी आव्हाडांवर नाराज असले, तरी पक्षात अंतिम शब्द थोरल्या पवार यांचाच चालतो, हे गेल्या काही महिन्यांत अनेक घटनांतून स्पष्ट झाले आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत अजित पवार यांचा समावेश झाला नाही, याकडे लक्ष वेधले जात आहे. त्यामुळे शरद पवार हे अजितदादांची समजूत काढतील व आव्हाड यांना चांगले खाते सुपूर्द करतील, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे.
सरनाईक यांनी दिला होता मोबाइल भेट
सरनाईक हे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी सिद्धिविनायक मंदिरात दानपेटीतील एका भक्ताने दान दिलेला व्हर्टू कंपनीचा महागडा मोबाइल त्यांनी लिलावात घेऊन अजित पवार यांना भेट दिला होता. मीडियात या प्रकरणाची चर्चा झाल्यावर पवार यांनी तो मोबाइल परत केला होता.