ठाणे : कोरोनामुळे सुमारे आठ महिने बंद असलेले ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालय आज पासून पूर्ववत सुरु झाले आहे. आज पहिल्या दिवशी येणाऱ्या सभासदांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ठाण्याचे गौरव असलेले, व १२७ वर्षे जुने असलेले मराठी ग्रंथ संग्रहालय आता पूर्ववत सुरु झाले. संस्थेची मुख्य शाखा व नौपाडा शाखा या दोन्ही ठिकाणी सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत पुस्तक देवघेव सुरु झाली आहे.
वाचकांना व सभासदांना घरबसल्या पुस्तकाची यादी दिसावी अशी सोय आता मराठी ग्रंथ संग्रहालयाने केली आहे. ग्रंथालयातील सुमारे १०००० (दहा हजार ) नव्या पुस्तकांची यादी PDF स्वरुपात मोबाइलवर किंवा मेल वर सर्वाना पाहता येईल. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी दिली. सभासदांसाठी एक विशेष सवलत योजना संस्थेने जाहीर केली आहे. आतापासून जे सभासद बारा महिन्यांची वर्गणी भरतील त्यांना चौदा महिन्यांसाठी म्हणजे डिसेंबर २०२१ पर्यंत सभासदत्व मिळेल. याचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले. पुढील आठवड्यात दिवाळी अंकाच्या विशेष योजनेची नोंदणी सुरु केली जाईल.
संस्थेची अभ्यासिकाही मर्यादित संख्येत लवकरच सुरु करत असून त्यासाठी नियमांचे कठोर पालन केले जाईल. त्यासाठी विद्यार्थांनी आपली नोंदणी करावी. तसेच संस्थेचे सभागृह देखील मर्यादित संख्येसाठी लवकरच उपलब्ध करून दिले जाईल अशी माहिती त्यांनी दिली.