वसई : फटाक्यांची आतषबाजी करीत नवीन वर्षाचे वसई विरारमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलिसांनी १३२ तळीरामांवर कारवाई करताना १२५ गाड्या आणि ४० जणांवर गुन्हेही दाखल केले. थर्टी फर्स्ट असल्याने वसईतील रिसॉर्ट आणि हॉटेल्स मध्ये मोठी गर्दी झाली होती. यंदा मद्य परवाने देण्यात आले नसल्याने ओल्या पार्ट्याना फाटा देण्यात आला होता. फक्त जेवण आणि डीजे पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे बहुतेक ठिकाणी पहाटे एक-दोन वाजेनंतर कार्यक्रम आटोपते घेण्यात आले होते. वसईतील समुद्रकिनारी मोठी गर्दी झाली होती. रात्री बाराच्या ठोक्याला वसईत विविध फटाक्यांची आतषबाजी बाजी करीत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. चिमाजी आप्पा मैदानात यंदाही जोरदार आतषबाजी करण्यात आली. नववर्ष असल्याने पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेऊन ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. वाहतूक शाखेसोबत स्थानिक पोलीसांचे गस्ती पथक तयार करण्यात आले होते. १० पोलीस निरीक्षकासह ६५ पोलीस अधिकारी, ४५० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी १३२ तळीरामांवर कारवाई केली. १२५ गाड्यांवर कारवाई करताना ४० लोकांवर गुन्हे दाखल केले गेले. यामुळे नववर्ष स्वागताचा सोहळा शांततेत पार पडला. (प्रतिनिधी)
वसईत नववर्षाचे जल्लोषात स्वागत !
By admin | Published: January 02, 2017 3:41 AM