कल्याण : सलग दोन दिवस पडलेल्या पावसाने सोमवारी सुटी घेतल्याने कल्याण पूर्व मतदारसंघातील उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, येथील मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत निरुत्साह दिसून आला. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघात ४५.१९ टक्के मतदान झाले होते. परंतु, यंदा अंदाजे ४२.७२ इतके मतदान झाल्याने टक्केवारी घटल्याचे स्पष्ट झाले.
कल्याण पूर्व विकासापासून वंचित असल्याचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच गाजला होता. हाच मुद्दा मतदानाची टक्केवारी घटण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. मतदानाच्या दिवशी सोमवारी सकाळपासूनच येथील बहुतांश मतदानकेंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक बुथवर मतदार आपले नाव मतदारयादीत आहे का, याचा शोध घेत होते. त्यासाठी छापील यादीबरोबरच मोबाइल अॅप्स व आॅनलाइनद्वारे नावे शोधण्याला अधिक प्राधान्य देण्यात आले. परंतु, कालांतराने हे चित्र फारसे दिसून आले नाही.
मतदानकेंद्राच्या १०० मीटर हद्दीत वाहने लावण्यास मनाई असतानाही अनेक ठिकाणी या नियमाचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच कोळसेवाडीमधील मॉडेल हायस्कूलमधील मतदानकेंद्राच्या कार्यकक्षातील १०० मीटरच्या आतही एका राजकीय पक्षाचा बुथ लावण्यात आला होता. भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांनी त्याला हरकत घेतली. त्यानंतर, तो बुथ हटविण्यात आला. तर, याच केंद्रावर एका मतदाराला त्याच्या नावासमोर ‘स्थलांतरित’ शेरा असल्याने त्याला मतदान करण्यास परवानगी नाकारण्यात आली, परंतु त्या मतदाराने तेथील केंद्रप्रमुखाशी संपर्क साधून आपले नाव हे पिवळ्या यादीत असल्याचे सांगितल्यावर त्याला मतदान करण्यास परवानगी देण्यात आली.
सम्राट अशोक विद्यालयातील एका मतदानकेंद्रामध्ये ईव्हीएम मशीन १० ते १५ मिनिटे बंद पडले होते. त्यामुळे या केंद्रावर मतदारांना काही मिनिटे ताटकळत उभे राहावे लागले. त्याचबरोबर या मतदानकेंद्राच्या बाहेर ईव्हीएम मशीनची चित्रे लावण्यात आली नव्हती, याकडे मतदारांनी लक्ष वेधल्यावर तातडीने चित्रे लावण्यात आली. चिंचपाड्यासह काही मतदानकेंद्रांवर मतदानयंत्रांच्या ठिकाणी अंधूक प्रकाश असल्याने उमेदवारांची नावे तसेच बटण योग्य प्रकारे दिसत नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. त्यानंतर, तत्काळ संबंधित ठिकाणी पुरेशा विजेची सुविधा करण्यात आली.
सर्वच मतदानकेंद्रे तळमजल्यावर असावीत, असा आयोगाने फतवा काढला होता. परंतु, जागा अपुरी पडल्याने तंबू आणि मंडपाचा आधार घेऊन त्यामध्ये केंदे्र उघडण्यात आली. मात्र, तेथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले.कल्याण पूर्व मतदारसंघात दिव्यांग मतदारांची संख्या २०८ इतकी आहे. मतदानासाठी त्यांना नेण्यासाठी रिक्षाची तसेच ने-आण करण्यासाठी केडीएमटीची बस मतदारसंघात फिरताना दिसून आली.
उमेदवारांनी बजावला हक्क
कल्याण पूर्व मतदारसंघात १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सोमवारी प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार परिवारासह मतदानाचा हक्क बजावताना दिसून आले. भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांनी कोळसेवाडीतील मॉडेल हायस्कूलमधील केंद्रावर मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुलभा, बहीण वंदना, मुलगी सायली आणि मुलगा वैभव होते. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश तरे यांनीही सपत्नीक खडेगोळवली येथील केंद्रावर तर, शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांनी उल्हासनगर-४ मधील संतोषनगर केंद्रावर मतदान केले.
आधीच ‘त्याच्या’ नावाने झाले मतदान : क ोळसेवाडी भागातील मतदानकेंद्रावर मतदानासाठी आलेल्या बिपिन पुरुषोत्तम या मतदाराला त्याच्या नावाने आधीच मतदान झाल्याचे सांगण्यात आले. ही बाब त्याने मतदान अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्याला मतपत्रिकेद्वारे मतदान करू दिले.