लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज २०० ट्रक-टेम्पो शेतमाल येतो. मात्र, शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपामुळे शुक्रवारी बाजार समितीत २३ ट्रेक व ४३ मिनी टेम्पोतून माल आला. केवळ ३० टक्केच मालाची आवक झाल्याने त्याचा परिणाम बाजार समितीच्या उत्पन्नावर झाला.शेतकरी संपाचा गुरुवारी पहिला दिवस होता. त्यादिवशी समितीच्या आवारात ७० टक्के माल आला होता. तर शुक्रवारी संपाच्या दुसऱ्या दिवशी ३० टक्केच माल आल्याने त्याचा परिणाम आणखी जाणवला. शेतकरी शेतमालाचे ट्रक फोडून माल रस्त्यावर फेकत असल्याने माल वाहतूकदारांनी भितीपोटी मालाची वाहतूकच केली नाही. कल्याण बाजार समितीत २३ ट्रक तर ४३ मिनी टेम्पोमधून कांदा-बटाटे, फळभाज्या, अन्न धान्याची आवक झाली. हा माल एकूण ३ हजार ५९४ क्विंटल होता. पाले भाज्या तसेच फुलेच आली नाहीत. नगर, नाशिक या भागातून शुक्रवारी फारसा माल आला नाही, असे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे मात्र, कल्याण तालुक्यातील लहान-मोठ्या गावांतील शेतकऱ्यांचा माल बाजार समितीत आला. तो जवळपास २ टन इतका होता. बाजारात मोठ्या प्रमाणावर माल न आल्याने घाऊक विक्रेत्यांना त्याचा फटका बसला. तसेच बाजार समितीच्या उत्पन्नावरही परिणाम जाणावला. भाव वाढलेकिरकोळ भाजी विक्रेत्यांनी शुक्रवारी दप्पट दराने भाजी विकली. शुक्रवारी वांगी आलीच नाहीत. कोंथबीरची जुडी कालपर्यंत १० रुपये दराने विकली गेली. तिचा दर शुक्रवारी लगेच ५० रुपये जुडी इतका झाला आहे. जुडीचा आकारही लहान झाला.भेंडी ६० रुपये किलो, दुधी ५० रुपये किलो, मिरची १०० रुपये किलो, ढोबळी मिरची ६० रुपये किलो, फ्लॉवर ४० रुपये किलो, टॉमेटो ४० रुपये किलोने विकली गेली. काही ग्राहकांनी संपाच्या भीतीपोटी मटार, वांगी आणि टोमॅटो यांची गुरुवारीच खरेदी केली होती.
कल्याणचा बाजार घसरला
By admin | Published: June 03, 2017 6:16 AM