राज्य महामार्गाचे काम करताना एमएमआरडीएचे नियोजन नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. या राज्य महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम करताना अंतर्गत जलवाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी कोणत्याही निधीची तरतूद करण्यात आली नव्हती. त्यामुळे निधीअभावी आहे त्या स्थितीत रस्ता पूर्ण करून घेण्याची घाई अधिकाऱ्यांनी केली आहे. एमएमआरडीएच्या घाईच्या कामामुळे हा राज्य महामार्ग आता वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. जलवाहिनी हटविता न आल्याने त्या जलवाहिनीवरच काॅंंक्रीट टाकून रस्ते करण्यात येत आहेत. काही ठिकाणी या जलवाहिन्या वर आल्याने आणि काही ठिकाणी या जलवाहिनीचे वॉल आल्याने त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करणे शक्य होत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यावर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने आणि हे काम लवकर उरकण्याच्या अनुषंगाने आता जलवाहिनी ज्या ठिकाणी वर आली आहे, त्या ठिकाणी आरसीसी भिंती उभारून ते काम तसेच सोडून दिले आहे. वर असलेल्या जलवाहिनीच्या ठिकाणी विहीरसदृश भिंत उभारली गेल्याने आता हीच विहीर वाहनचालकांसाठी जीवघेणी ठरत आहे. रात्री भिंतीचा अंदाज न आल्याने अनेक वाहने या भिंतीवर धडकत आहेत. रस्त्याच्या मध्यभागी असलेली ही भिंत काढून टाकावी, अशा सूचना आमदार बालाजी किणीकर यांनी दिल्या होत्या. अधिकाऱ्यांनीही ती भिंत काढण्याचा दिखावा केला. मात्र प्रत्यक्षात भिंत काढल्यानंतर त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करणार कसे आणि जलवाहिनी स्थलांतरित करणार कशी याबाबत कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही.
राज्य महामार्गाच्या तीन किलोमीटरच्या अंतरावर तब्बल सहा ठिकाणी अशी रस्त्याच्या मध्यभागी विहीरसदृश्य भिंत उभारण्यात आली आहे. या विहिरीत पाणी नसले तरी पाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिन्या असल्याने त्या स्थलांतरित कराव्यात कशा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
----------------फोटो आहे.