ठाणे : ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्यासाठी ठाणे महापालिकेने शहरातील विविध सोसायट्यांना पुन्हा नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. यासाठी एक महिन्याची मुदतही दिली आहे. तर सोसायट्यांकडून कचरा वर्गीकृत करून दिला जात असला तरी महापालिकेकडून तो एकत्रित गोळा करून तसाच डम्पिंगवर टाकला जात आहे. त्यामुळे महापालिकेने आधी स्वत:ची यंत्रणा सुधारावी, मगच ठाणेकरांना शिस्त लावावी, असा सूर आता उमटू लागला आहे.
महापालिका हद्दीत रोज ९६३ मेट्रिक टन कचरा निर्माण होत असून तो दिवा डम्पिंगवर टाकला जात आहे. परंतु, स्वच्छ सर्वेक्षण मिशनअंतर्गत कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी, ओला आणि सुका कचरा वेगळा करावा, कचऱ्याची योग्य वाहतूक करणे, त्यावर प्रक्रिया करावी हे महत्त्वाचे मानले गेले आहे. त्यानुसार महापालिकेचा २०२० मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात वरचा क्रमांक आला होता. परंतु, महापालिकेला अद्यापही वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे यासाठी पुन्हा पालिकेने शहरातील सोसायट्यांना आपले लक्ष्य केले आहे. सोसायट्यांनीच ओला आणि सुका कचरा वेगळा करून द्यावा असे फर्मान काढले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीदेखील साेसायट्यांनी त्यांच्याच ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावावी यासाठी तीन वेळा नोटीस बजावल्या होत्या. परंतु, त्यानंतरही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.
दरम्यान, आता सोसायट्यांना पुन्हा नोटीस बजावून एक महिन्याची मुदत दिली आहे. या मुदतीत त्यांनी ओला-सुका कचरा वेगळा करून दिला नाही, तर कचराकोंडी केली जाईल, असा इशाराही दिला आहे. परंतु सोसायटींवर एकीकडे दबाव टाकत असताना पालिका मात्र वर्गीकृत केलेला कचरा हा आजही एकत्रितपणे उचलत आहे. अनेक घंटागाड्यांना दोन कप्पे असले तरी आतील कप्पा हा एकच असल्याचे दिसत आहे. तर कचरा वेगळा उचलला जात असला तरी तो सीपी तलाव येथे एकत्रित डम्प केला जात असून तो तेथून डम्पिंगवर नेऊन टाकला जात आहे.