ठाणे : कोरोना काळात ठाणे शहरासह ठाण्याच्या पलीकडे अनधिकृत बांधकामे जोमात सुरू असल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या असून काही लोकप्रतिनिधींकडूनदेखील याबाबत सर्वसाधारण सभेत आवाज उठवला जात आहे. त्यामुळे आता ठाण्याचे प्रथम नागरिक नरेश म्हस्के यांनी गंभीर दखल घेऊन शहरातील अनधिकृत बांधकामांची नेमकी वस्तुस्थिती काय आहे ? याचा खुलासा प्रशासनाकडून मागितला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना पत्र दिले असून जर अनधिकृत बांधकामे होत असतील तर अशा बांधकामांवर कारवाई करून महापालिकेची प्रतिमा सुधारावी अशी सूचना केली आहे.
ठाण्यातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वागळे, माजिवडा-मानपाडा, कळवा, मुंब्रा आणि दिवा अशा सर्वच प्रभाग समितींमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. केवळ नागरिकांच्याच नव्हे तर लोकप्रतिनिधींच्यादेखील मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याबाबत महापौरांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. चांगले काम करूनही अनधिकृत बांधकामांमुळे महापालिकेची अशाप्रकारे बदनामी होत असेल तर नेमकी अनधिकृत बांधकामांची वस्तुस्थिती काय आहे याचा खुलासा करणे आवश्यक असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यामुळे ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी येत आहेत त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहणी करावी अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे होत असतील तर अशा बांधकामांवर कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, असे आपल्या पत्रामध्ये महापौरांनी स्पष्ट केले आहे. महापौरांच्या पत्रानंतर पालिका आयुक्त अशा अनधिकृत बांधकामावर कशा पद्धतीने कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सहाय्यक आयुक्तांची कारवाई हा संशोधनाचा विषय
ज्या प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकामे होत आहेत त्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त काय करतात असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे संबंधित प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त काय कारवाई करतात हा तर संशोधनाचा विषय आहे, असा उपरोधिक टोलादेखील महापौरांनी प्रशासनाला लगावला आहे. त्यामुळे आता अनधिकृत बांधकामावरून सहाय्यक आयुक्तदेखील अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.