- जितेंद्र कालेकर, ठाणेपाण्यासाठी करावी लागते भटकंतीराज्य विमा कामगार योजना महामंडळाच्या रुग्णालयात सफाई कामगार आणि कक्षसेवकाचे काम करणाऱ्या कर्मचाºयांची वागळे इस्टेट येथे २७ इमारतींची मोठी वसाहत आहे. वसाहत आणि रुग्णालयाची जागा केंद्र सरकारची असून ती राज्य सरकारने भाड्याने घेतली आहे. अर्थात, रुग्णालय आणि वसाहतीच्या दुरुस्तीचा विषय केंद्र्राच्या अखत्यारित असल्याने या कामासाठी राज्य आणि केंद्र सरकारची यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवते. त्यामुळे देखभालीअभावी येथील २७ पैकी आठ इमारतींना उतरती कळा आली आहे. रुग्णांची देखभाल आणि रुग्णालयाच्या सफाईचे काम चोखपणे बजावणाºया या कर्मचाºयांना धोकादायक इमारतींमध्ये अक्षरश: जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांच्या वसाहतीमध्ये प्रत्येक खोलीचे बांधकाम धोकादायक आहे. तळमजल्यावरील घरांची जमीन पोखरून उंदीर-घुशींचा वावर वाढला आहे. येथील काही इमारतींमधील रहिवाशांना गेल्या महिनाभरापासून पाणी मिळाले नाही. पाण्यासाठीही त्यांना भटकंती करावी लागते. या वसाहतीमधील समस्यांचा पाढा वाचताना महिलांच्या डोळ्यांत पाणी आले होते.एकेकाळी आशिया खंडामध्ये सर्वाधिक लघुउद्योग हे ठाणे शहरातील वागळे इस्टेटमध्ये होते. त्यामुळे सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून वागळे इस्टेट औद्योगिक वसाहतीचा राज्यात आणि जिल्ह्यातही लौकिक होता. येथील शेकडो कंपन्यांमधील कामगारांसाठी केंद्र सरकारच्या जागेत केंद्राने राज्य विमा योजनेच्या रुग्णालयाचे आणि रुग्णालयीन कर्मचाºयांच्या वसाहतीचे १९७८ मध्ये बांधकाम केले. जागा आणि इमारत ही केंद्राची असली, तरी ती राज्य सरकारने भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतली आहे. दुरुस्ती आणि देखभालीपोटी लाखो रुपये मिळूनही रुग्णालय आणि वसाहतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले. एकेकाळी ५०० बेडचे हे रुग्णालय राज्य सरकारचे कामगारांसाठी असलेले एकमेव मोठे रुग्णालय म्हणूनही ओळखले जात होते. आता या रुग्णालयाची कर्मचारी आणि सामग्रीअभावी पुरती वाताहत झाली आहे. अनेक सुविधांअभावी आता अवघ्या ५० बेडच्या रुग्णालयाचा कारभार कसाबसा सुरू आहे. त्यामुळे साध्या थंडीतापालाही या रुग्णालयातून खासगी रुग्णालयात किंवा मुलुंडच्या कामगार रुग्णालयात कामगारांना पाठवले जाते. रुग्णालयाची लिफ्ट ही तर रुग्ण, रुग्णालयीन कर्मचारी आणि डॉक्टरांसाठी गंभीर समस्या झाली आहे. गेल्या वर्षभरापासून ही लिफ्ट दुरुस्तीअभावी बंद आहे. त्यामुळे एखाद्या रक्तदाब किंवा हृदयरोग्याला उपचारासाठी घेऊन जायचे म्हटल्यास कठीण प्रसंग उभा राहतो.रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे जेवण पहिल्या आणि दुसºया मजल्यावर कर्मचाºयांना डोक्यावरून न्यावे लागते. लिफ्ट दुरुस्त करणे, हे आमच्या हातात नसल्याचे कारण देत रुग्णालय प्रशासन सोयीस्कररीत्या हात झटकते. त्यामुळे तळ अधिक पाच मजल्यांच्या या भल्यामोठ्या रुग्णालयाच्या पायºया चढताना रुग्णांची दमछाक होते. अर्थात, पहिल्या दोन मजल्यांपर्यंतच सध्या रुग्णांचे वॉर्ड आहेत. तिसºया आणि चौथ्या मजल्यावरील वॉर्ड बंद आहेत. पाचव्या मजल्यावर केवळ एक कार्यालय आहे. रुग्णालय धोकादायक असले, तरी त्याची दुरुस्ती करून ते चांगल्या प्रकारे चालवले जाऊ शकते. पण, केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवत असल्यामुळे रुग्णालयाची पार दुरवस्था झाली आहे.सुमारे २२ एकरच्या जागेत कामगार रुग्णालय आणि रुग्णालय कर्मचाºयांची निवासी वसाहत आहे. पण, जी अवस्था रुग्णालयाची तीच, किंबहुना त्याहून जास्त गंभीर अवस्था रुग्णालयीन कर्मचाºयांच्या वसाहतीची आहे. याठिकाणी, सध्या २७ निवासी इमारती आहेत. त्यापैकी क्रमांक १, १, ५, ७, १९, २४, २६ आणि २७ या आठ इमारती धोकादायक असल्या, तरी त्या दुरुस्त करून राहण्यास योग्य असल्याचे ठाणे महापालिकेने म्हटले आहे. क्रमांक ३, ४, ६ आणि ८ते १८ तसेच क्रमांक २० ते २३ अशा १९ इमारती अतिधोकादायक असून त्या निवासासाठी अयोग्य असल्याने त्या रिक्त करण्याच्या नोटिसा महापालिकेने बजावल्या आहेत. त्यानंतर, त्या सर्व रिक्त करण्यात आल्या. आता या इमारती खासगी ठेकेदाराकडून पाडण्यात येत आहेत. पण, त्या पाडताना ठेकेदाराने योग्य काळजी न घेतल्याने या वसाहतीच्या पाण्याची वाहिनीच नादुरुस्त झाली. ही वाहिनी मध्येच कुठेतरी फुटल्याने अनेक रहिवाशांना सध्या पाणीच मिळत नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आठपैकी २४ आणि २७ या दोन इमारतींची पाच महिन्यांपूर्वीच दुरुस्ती करण्यात आली. पण, तीही तात्पुरत्या स्वरूपाची झाल्याने या इमारतीच्या अनेक भिंतींना तडे गेले आहेत. इमारत क्रमांक २७ ची दुरुस्ती करून रंगरंगोटीही केली. पण, अर्धवट कामामुळे या दुरुस्तीचा बट्ट्याबोळ झाला आहे.
उंदीर, घुशींचा वावरवसाहतीच्या अंतर्गत रस्त्यांमध्ये चिखल, ठिकठिकाणी साचलेले घाण पाणी आणि कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. उंदीर, घुशींचा या परिसरात वावर असतो. उंदीर जमीन पोखरून या इमारतींच्या तळ मजल्यावर कोणत्याही भागातून कुणाच्याही घरात शिरण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांना सतत याची भीती असते. घराच्या जमिनी पोखरल्या असून स्लॅब आणि भिंतींना गळती असल्यामुळे किचनसह बाथरूम आणि स्वच्छतागृहांच्या भिंतींमध्ये ओलावा झाला आहे. इतरत्र भाड्याने किंवा विकत खोली घेऊन राहणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे येथील रहिवासी सांगतात. दोन्ही बाजूंनी कोंडी असल्यामुळे नाइलाजास्तव तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाºयांना धोकादायक इमारतींमध्ये दिवस कंठावे लागत आहेत.दुरुस्तीमध्ये चालढकलकामगार रुग्णालय वसाहतीमधील आठ इमारती धोकादायक आहेत. पण, त्या दुरुस्त करून राहण्यास योग्य आहेत. त्यामुळे त्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारकडून खासगी कंत्राटदारही नेमले जातात. पण, त्यांची लाखो रुपयांची बिलेच दिली जात नसल्यामुळे इमारतीच्या दुरुस्तीची कामे लांबणीवर पडतात किंवा ती अर्धवट केली जातात. बिलेच मिळत नसल्यामुळे ही कामे करण्यासाठी कंत्राटदारच मिळत नाही. आता ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याचा निर्णय एका उच्चस्तरीय बैठकीत घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.विजेचा लपंडावइमारतींमधील घरांच्या दुरवस्थेचा चोरट्यांनी गैरफायदा घेतला आहे. महिला आणि पुरुषवर्ग कामासाठी बाहेर असताना खिडकीचे गज तोडून भुरटे चोर आत शिरकाव करतात. किशोर गोरिया यांच्या घराच्या खिडकीचे रॉड काढून स्टोव्हसहित आवश्यक सामग्री चोरट्यांनी लंपास केली होती. आणखीही काही जणांकडे चोºया झाल्याचे रहिवासी सांगतात. छोटी कामे करण्यासाठी ठेकेदाराने तिथे एक रूम घेतली. या रूममध्ये ठेवलेल्या सामानावरही चोरट्यांनी डल्ला मारला. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे या परिसरात अंधाराचे साम्राज्य असते. याशिवाय, या इमारतींना वीजपुरवठा करणाºया वाहिन्या जीर्ण झाल्यामुळे शॉर्टसर्किटच्याही घटना घडतात. लहान मुले आणि ज्येष्ठांना या वीजवाहिन्यांचा धोका असल्याचेही येथील रहिवासी सांगतात.अपुºया घरभाडेभत्त्यावर बोळवण...वसाहतीतील इमारत क्रमांक-१ मध्ये वर्ग-१ चे वैद्यकीय अधिकारी, दोन ते पाच क्रमांकांच्या इमारतींमध्ये वर्ग-२ चे अधिकारी, तर उर्वरित इमारतींमध्ये वर्ग-३ आणि वर्ग-४ च्या श्रेणीतील सफाई कामगार आणि कक्षसेवक वास्तव्याला आहेत. येथील वर्ग-१ च्या अधिकाºयांच्या इमारती वगळता इतर इमारतींना उतरती कळा लागल्याचे चित्रआहे. एक ते पाच क्रमांकांच्या इमारती अधिकाºयांसाठी आहेत. त्या वन बीएचके असून ४०० चौरस फुटांच्या क्षेत्रफळांच्या आहेत. उर्वरित इमारती या वन रूम किचनच्या २५० चौरस फुटांच्या आहेत.सर्वाधिक समस्या वन रूम किचनच्या खोल्या असलेल्या इमारतींमध्येच आहेत. पण, दुरुस्ती करताना तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाºयांच्या इमारतींकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप या रहिवाशांनी केला आहे. वैद्यकीय अधिकाºयांच्या निवासस्थानामध्ये केवळ मुलुंडच्या कामगार रुग्णालयाचे एक डॉक्टर वास्तव्याला आहेत. त्यामुळे कर्मचाºयांच्या धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमधील कुटुंबीयांनाही अधिकाºयांच्या इमारतींमधील रिक्त सदनिका द्याव्यात, अशी येथील कर्मचाºयांची मागणी आहे.या इमारती धोकादायक असल्यामुळे कर्मचाºयांनी एचआरए (घरभाडेभत्ता) घेऊन इतरत्र घरे भाड्याने घ्यावीत, असेही प्रशासनाकडून सांगितले जाते. पण, घरभाडे मूळ वेतनाच्या ३० टक्के दिले जाते. त्यामुळे ज्यांच्या २५० चौरस फूट क्षेत्रफळांच्या खोल्या आहेत, त्यांना तीन ते चार हजार रुपये एचआरए दिले जाते. हे एचआरए घेतल्यानंतर बाहेर बाजारभावाप्रमाणे १० ते १२ हजार रुपये घरभाडे, लाइटबिल आणि पाणीबिल भरल्यानंतर पगार कसा पुरणार, असा सवालही या कर्मचाºयांनी केला आहे.