अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी FIR दाखल केला आहे. ठाणे शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या संजय शिंदे यांनी दिलेल्या माहितीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संजय यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला असून, अक्षय शिंदेने गोळीबार करण्यापूर्वी काय म्हटले याचाही उल्लेख एफआरआयमध्ये करण्यात आलेला आहे.
अक्षय शिंदेचा ताबा घेण्याचे वॉरंट होते
पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी म्हटले आहे की, आरोपी अक्षय शिंदेचा ताबा घेण्यासंदर्भात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून वॉरंट घेण्यात आले होते. नीलेश मोरे, अभिजीत मोरे आणि हरिश तावडे असे आम्ही अक्षय शिंदेला ताब्यात घेण्यासाठी तळोजा कारागृहात गेलो होतो. सायंकाळी साडेपाच वाजता अक्षय शिंदेला घेऊन तळोजा कारागृहातून बाहेर पडलो, असे त्यांनी म्हटले आहे.
अक्षय शिंदेंने पोलिसांना केली शिवीगाळ
संजय शिंदे हे व्हॅनमध्ये समोर चालकाच्या बाजूला बसलेले होते. तर नीलेश मोरेंसह दोन पोलीस कर्मचारी आरोपी अक्षय शिंदेसह व्हॅनमध्ये मागे बसलेले होते. व्हॅन शिळ डायघर पोलीस ठाण्याजवळ आल्यानंतर नीलेश मोरेंनी संजय मोरंना कॉल केला आणि अक्षय शिंदे हा शिवीगाळ करत असल्याचे सांगितले.
एफआरआयमधील नोंदीनुसार, "मला तुम्ही पुन्हा कशासाठी घेऊन जात आहात? आता मी काय केले आहे?", असे अक्षय शिंदे मोरेंना बोलत होता. त्यानंतर व्हॅन थांबवण्यात आली. आरोपी अक्षय हा नीलेश मोरे आणि अभिजीत मोरे यांच्या मध्ये बसला होता. तर संजय शिंदे हे त्याच्या समोरच्या बाजूला बसले.
त्यानंतर व्हॅन पुढे निघाली. मुंब्रा बायपास रोडवर मुंब्रा देवीच्या पायथ्याजवळ असताना अक्षय शिंदे हा नीलेश मोरेंच्या कमरेला असलेले रिव्हॉल्व्हर खेचू लागला. "मला जाऊ द्या", असे तो म्हणत होता.
मोरेंच्या मांडीत घुसली गोळी
झटापटीत रिव्हॉल्व्हर लोड झाले आणि १ राऊंड फायर होऊन नीलेश मोरेंच्या मांडीत गोळी लागली. त्यानंतर अक्षय शिंदेने मोरेंचे रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतले आणि "आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", असे म्हणत दोन राऊंड फायर केले. आमच्या दिशेने गोळ्या झाडल्या पण, निशाणा चुकला.
संजय शिंदेंनी एफआरआयमध्ये म्हटले आहे की, अक्षय शिंदे आमच्यावर गोळ्या झाडणार, याची खात्री झाली. त्यामुळे मी स्वरक्षणार्थ माझी रिव्हॉल्व्हर काढली आणि १ गोळी अक्षय शिंदेच्या दिशेने झाडली. त्यात तो जखमी झाला आणि खाली पडला. त्याच्या हातातील रिव्हॉल्व्हर सुटली. त्यानंतर त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखले केले. पण, रुग्णालयात आणण्यापू्र्वीच त्याचा मृत्यू झाला होता.