ठाणे : इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला फ्लाइंग किस देणाºया एका युवकाचा खटला सात वर्षे चालला. हा खटलाच एक प्रकारची शिक्षा गृहीत धरून त्याला आणखी तुरुंगवासाची शिक्षा न सुनावण्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत, न्यायालयाने त्याला पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.२८ जून २०१० रोजी ही घटना घडली होती. याच भागातील ब्राह्मण विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकणारी पीडित विद्यार्थिनी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास मैत्रिणीसोबत घराकडे पायी जात असताना वर्तकनगरातील महापालिकेच्या रुग्णालयाजवळ चार उनाड मुले उभी होती. त्यापैकी एकाने पीडित विद्यार्थिनीचा पाठलाग केला. थोडे अंतर कापल्यानंतर मुलीने मागे वळून पाहिले असता, लाल रंगाचा शर्ट घातलेल्या आरोपीने तिला ‘फ्लाइंग किस’ दिला. यामुळे भेदरलेल्या मुलीने घरी जाऊन वडिलांना हा प्रकार सांगितला. वडिलांनी लगेच वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अभिजित भुजबळ यांनी आरोपी मंदार अरुण जगताप याला अटक करून प्रकरणाचा तपास केला. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आर.टी. इंगळे यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. घटनेच्या वेळी पीडित विद्यार्थिनीसोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीसह तीन साक्षीदार सरकार पक्षाने तपासले. तिन्ही साक्षीदार शेवटपर्यंत त्यांच्या जबाबावर कायम राहिले.घटनेच्या वेळी आरोपी २१ वर्षांचा होता. या वयात अशा चुका होत असतात. याशिवाय, सात वर्षे आरोपी खटल्याला सामोरा गेला. ही एक प्रकारची शिक्षाच आहे. आणखी तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यास तो अट्टल गुन्हेगार होईल, अशी भीती व्यक्त करून बचाव पक्षाने आरोपीला आर्थिक दंड सुनावण्याची विनंती केली. तपास अधिकाºयाने निर्विवादपणे गुन्हा सिद्ध केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवून, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे शनिवार, १६ डिसेंबर रोजी आरोपीस पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
एक फ्लाइंग किस पडला पाच हजार रुपयांना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:37 AM