डोंबिवली : फेरीवाल्यांच्या हाणामारीप्रकरणी राज्यमंत्री व नवनिर्वाचित आमदार रवींद्र चव्हाण यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना खरमरीत पत्र लिहून कारवाईची मागणी केली असताना दुसरीकडे चव्हाण यांच्या या भूमिकेचा फेरीवाला संघर्ष समितीने निषेध केला आहे. कारवाई करण्याची भाषा करणाऱ्या राज्यमंत्र्यांनी पाच वर्षे फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी काय केले?, असा सवाल संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी केला आहे.
फेरीवाल्यांच्या दोन गटांत सोमवारी हाणामारी झाल्यानंतर केडीएमसीने बुधवारपासून रेल्वेस्थानकातील १५० मीटर हद्दीत अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांविरोधात कारवाईची विशेष मोहीम उघडली आहे. मात्र, चव्हाण यांनी तत्पूर्वी आयुक्तांना खरमरीत पत्र पाठवून बेकायदा फेरीवाल्यांचे समूळ उच्चाटन करणे आपल्या प्रशासनाला जमत नसेल तर अशा कुचकामी प्रशासनाचे प्रमुख या नात्याने आपण बदली करून घ्यावी हे उत्तम, अशा शब्दांत खडेबोल सुनावले आहेत. त्यामुळेच खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने बुधवारी सायंकाळपासून कारवाईला प्रारंभ केला.
दुसरीकडे फेरीवाला संघर्ष समितीने मात्र चव्हाण यांची भूमिका एकाकी असल्याचा आरोप केला आहे. फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली गेली आहे, मात्र पाच वर्षे राज्यमंत्री असतानाही फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी चव्हाण यांनी काय केले? राज्यमंत्री म्हणून चव्हाण राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्याच सरकारचे धोरण न राबविता के वळ कारवाईची भूमिका घेणे चुकीचे आहे.एकीकडे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा, असे सरकार आदेश देते तर दुसरीकडे धोरणाची अंमलबजावणी न करता कारवाईची भाषा सुरू आहे, हा दुटप्पीपणा चव्हाण यांनी थांबवावा आणि सामंजस्याची भूमिका घ्यावी अशी मागणी समितीचे अध्यक्ष मोरे यांनी केली आहे.माझे शहर शांत राहिले पाहिजे - चव्हाणफेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे काम आयुक्तांचे आहे. आता जे हाणामारीचे प्रकार शहरांमध्ये घडले आहेत ते पूर्णपणे थांबले पाहिजेत. याप्रकरणी कडक कारवाई झाली पाहिजे. कोणाला नुकसान पोहोचावे आणि कोणाला फायदा व्हावा, याच्याशी मला काही देणेघेणे नाही. डोंबिवली सारख्या सुसंस्कृत शहरात जे प्रकार घडतायत ते निंदनीय आहे. अरविंद मोरे यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. माझे शहर फेरीवालामुक्त असावे. शांतता राहावी आणि नागरिकांना रस्ते पदपथ चालण्यासाठी राहावेत असे माझे मत आहे, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.तातडीने धोरण राबवा - कांबळेडोंबिवली हॉकर्स भाजीपाला फेडरेशन या फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी फेरीवाला धोरणाची विनाविलंब अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी केली आहे. आम्ही फेरीवाला शहर समितीचे सदस्य म्हणून प्रशासनाला काही सूचना केल्या होत्या. परंतू, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परप्रांतीय फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढल्याचे कबूल करताना कांबळे यांनी बाहेरून व्यवसायासाठी येणाºया फेरीवाल्यांचे समर्थन केले आहे. डोंबिवलीकर व्यवसाय करण्यासाठी अन्य शहरांमध्ये जात नाहीत का?, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.फेरीवाला हा देखील एक माणूस आहे. त्यालाही पोट आहे. परंतु, केडीएमसी प्रशासन फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला जाणूनबुजून विलंब लावत असल्याकडेही मोरे यांनी लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे मोरे हे शिवसेना कल्याण पश्चिम आणि पूर्व विधासभा क्षेत्रप्रमुख आहेत.राज्यमंत्री चव्हाण हे भाजपाचे नवनिर्वाचित आमदार आहेत. दरम्यान, मोरे यांच्या वक्तव्यावर चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहता फेरीवाला कारवाईवरून शिवसेना-भाजपचे पदाधिकारी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.