लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रेल्वेचे अधिकारी ही घरे खाली करण्यासाठी धमकावत असल्याने दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असे म्हणत ‘गरीब की जान क्या जान नहीं होती शेठ?’ असा सवाल, धाडलेली नोटीस पोस्ट करून, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर केला आहे.
मध्य रेल्वेमार्गावरील कळवा-मुंब्रा-दिवापासून ते थेट कल्याण-कर्जतपर्यंत रेल्वे रुळांशेजारी असलेली घरे हटविण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिले होते. तशी कारवाईही रेल्वे अधिकाऱ्यांनी सुरू केली होती. दरम्यान, जितेंद्र आव्हाड व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आंदोलनानंतर व रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या निवेदनानंतर ती मागे घेण्यात आली. आधी या रहिवाशांचे योग्य ठिकाणी स्थलांतर केल्यानंतरच रेल्वेचा हा परिसर रिकामा करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनीकुमार यांनी दिले होते. मात्र, शुक्रवारी ‘उद्या रेल्वे बंद पडल्यास दोष देऊ नका,’ असा इशाराही रेल्वेमंत्री अश्विनीकुमार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वे अधिकाऱ्यांना त्यांनी दिला आहे.
दिव्याच्या पाचव्या आणि सहाव्या लाइनच्या उद्घाटनासाठी रेल्वेमंत्री अश्विनीकुमार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे ठाण्यात आले होते. त्यावेळी आव्हाड यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी जोपर्यंत रहिवाशांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत कारवाई होणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र दानवे यांनी आव्हाडांच्या मागणीला केराची टोपली दाखवून रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वे लाइन परिसरातील घरे खाली करण्याचे आदेश देऊन त्यांना धमकावण्याचे सत्र सुरू केले आहे.