लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा- भार्इंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे उरले आहे काय? असा खडा सवाल करत पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी करणार नाही असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी जाहीर केले; तर आघाडीचा फायदा काँग्रेसलाच होणार असून प्रदेश नेतृत्व आघाडीचा निर्णय घेईल, असे सांगत माजी खासदार संजीव नाईक यांनी ‘वरून’ आघाडीचा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. पण भिवंडीत ज्याप्रमाणे काँग्रेसने राष्ट्रवादीचा दबाव झुगारून देत स्वबळावर यश मिळवले, त्याचाच कित्ता मीरा-भार्इंदरमध्येही गिरवला जाण्याची शक्यता आहे.मीरा- भार्इंदर राष्ट्रवादी काँग्रेसमधून माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्यासह पालिकेतील २८ पैकी २७ नगरसेवक, माजी जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी बाहेर पडल्याने राष्ट्रवादी खिळखिळी झाली आहे. जिल्हाध्यक्षपदी असताना जयंत पाटील यांंनी काँग्रेसशी आघाडीचा प्रस्ताव पुढे केला होता. पाटील हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असल्याने दोन्ही काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांमध्ये चर्चा झाली होती. परंतु अंतर्गत वादातून पाटील यांनी पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीच्या १२ इच्छुक उमेदवारांसह माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पाटील यांच्यासोबत अनेक उमेदवार, पदाधिकारी राष्ट्रवादी सोडून गेल्याने पक्षाची स्थिती अधिकच बिकट झाली. उरल्यासुरल्या नेत्यांतील गटबाजी संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने पक्ष पोखरला गेला आहे.राष्ट्रवादीतून मोठा गट काँग्रेसमध्ये आल्याने आता स्थानिक काँग्रेस नेतृत्वानेही आघाडी करण्याचा निर्णय बदलला आहे. सध्या राष्ट्रवादीची भिस्त ही माजी मंत्री गणेश नाईक व माजी खासदार संजीव नाईक या पितापुत्रांवर आहे. मीरा- भाईंदरमध्ये दोघांचाही जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे निवडणुकीची धुरा नाईक कुटुंबाच्या खांद्यावर आहे. दुसरीकडे निवडणुकीत वाद नको म्हणून नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा विषयही निवडणुकीपर्यंत बाजूला ठेवण्याची भूमिका निष्ठावंतांनी घेतली आहे.संजीव नाईक यांनी मीरा-भार्इंदरमध्ये छोट्या भावाची भूमिका घेत काँग्रेससोबत आघाडी करण्याची भूमिका प्राधान्याने घेतली. त्या शिवाय समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु काँग्रेस जिल्हाध्यक्ष सावंत यांनी राष्ट्रवादीत काही उरलेच नसल्याने आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, अशी रोखठोक भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार नाही, असे सावंत यांनी जाहीर केल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट आहे. राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या जयंत पाटील व समर्थकांनी अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी सोबत घरोबा करण्यास विरोध केल्याचे कारणही सांगितले जाते.
राष्ट्रवादीत उरलेय काय?
By admin | Published: July 07, 2017 6:19 AM