लोकमय न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील जवळजवळ सव्वालाख विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. हा आनंद दोन दिवस असतानाच पुढील अभ्यासक्रमासाठी ‘सीईटी’ची परीक्षा सक्तीची केली. त्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी २५ जुलै ही शेवटची मुदत घोषित झाली. या घाईगडबडीत असतानाच शाळा सोडण्याचा दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; पण आता या दाखल्यावर तारीख काय टाकावी आणि शेरा काय द्यावा, या संभ्रमावस्थेत मुख्याध्यापकांसह पालक आणि विद्यार्थी सध्या दिसून येत आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दाखले काढण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र, दाखल्यावर तारीख कुठली आणि शेरा काय द्यायचा याबाबत कुठल्याच सूचना नाहीत. त्यामुळे मुख्याध्यापकांमध्ये संभ्रम आहे. ‘इयत्ता १० वी परीक्षा मार्च २०२१ उत्तीर्ण’ असा शेरा द्यावा, शेऱ्यात परीक्षेचा दिनांक काय लिहावा, असा संभ्रम जिल्ह्यातील काही मुख्याध्यापकांमध्ये असल्याचे निदर्शनात आले आहे. याबाबत शिक्षण मंडळाकडून काहीही सूचना शाळांना आलेल्या नसल्याचे ऐकायला मिळत आहे. यामुळे यंदाच्या विद्यार्थ्यांचा दहावी, बारावीचा दाखला तयार करताना मुख्याध्यापकांना संभ्रमावस्थेला तोंड द्यावे लागत आहे.
जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागाच्या नियंत्रणात एक हजार ६२० माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमधील तीन लाख ७७ हजार ५९ विद्यार्थ्यांना यंदा दहावीची परीक्षा देणे अपेक्षित होते; पण कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ती घेण्यात आली नाही. विद्यार्थ्यांच्या शाळेतील अंतर्गत मूल्यांकनावर गुण देऊन त्यांना उत्तीर्ण केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील एक लाख २४ हजार ९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला न बसता हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारा शाळा सोडण्याचा दाखला मुख्याध्यापकांना द्यावा लागणार आहे; पण या दाखल्यातील ‘शेरा’ या काॅलममध्ये परीक्षेचा दिनांक काय नमूद करावा, ही समस्या भेडसावत आहे. या आधी ‘परीक्षा मार्च’ असे लिहिल्यानंतर वर्षे लिहिले जात होते; पण आता परीक्षेचा महिना काय, कोणत्या महिन्यातील परीक्षा, असे नमूद करण्याची अडचण मुख्याध्यापकांना आलेली आहे.
------------