ठाणे : क्लस्टर म्हणजे इमारती नुसत्या उभ्या नाही तर नवीन शहर निर्माण करायचे आहे. नविन शहर निर्माण करताना आवश्यक सोयी सुविधा देणार असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. क्लस्टर हा माझ्या जीव्हाळ्याचा विषय आहे. त्यासाठी मी खूप लढाई केली. असेही ते म्हणाले.
आशिया खंडातील सर्वात मोठ्या समूह पुनर्विकास योजनेतील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अभिन्यासामधील भूखंड क्रमांक एफ-२ वरील प्रकल्पाच्या शुभारंभांचा सोहळा शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वागळे इस्टेट रोड क्रमांक २२ येथे संपन्न झाला. यावेळी "आनंदवन" फॉरेस्ट इन दी सिटी आणि क्लस्टर समूह विकास योजनेची चित्रफीत दाखविण्यात आली. स्वप्नवत वाटणारे क्लस्टरचे आज प्रत्यक्ष काम सुरू झाले. पहिल्या टप्प्यात साडेदहा हजार घरे होत आहेत. पुढचा टप्पाही लवकरच होणार आहे. क्लस्टर झाले पाहिजे ते कागदावर राहू नये त्यासाठी असलेल्या त्रुटी दूर केल्या, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
भारतातला हा एकमेव प्रकल्प १५०० हेक्टरमध्ये होतोय. ज्या दिवशी धोकादायक इमारतीतील लोकांना या हक्काच्या घरांमध्ये चावी देईल तो दिवस महत्त्वाचा असेल. डीप क्लीनींग ड्राईव्ह म्हणजे काय? याची माहिती देताना शिंदे म्हणाले की, मुंबईत देखील स्वच्छतेबाबत जागृती झाली आहे. हे फोटो सेशन नाही हे स्वच्छता मिशन आहे. मला काम करायचे आहे मला फोटोची गरज नाही. राज्यात डबल इंजिन सरकारचे काम करत आहे. रामाचा जयघोष होत आहे. ही ड्राईव्ह संपूर्ण राज्यात होईल स्वच्छ महाराष्ट्र अभियान असे अभियान होईल यातून लोकचळवळ निर्माण होईल, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले.
आनंदवन म्हणजे २७ किलोमीटर ५०० मीटर रुंदीचा श्रीनगरपासून गायमुखपर्यंत पहिला टप्प्यात निसर्गाचा आनंद घेता येईल वनविभाग आणि पालिकाच्यावतीने मोठ्या प्रमाणात झाडे लावणार आहे. जिथे जागा तिथे वृक्षारोपण करुन ग्रीन पॅच तयार करुन ऑक्सीजन पार्क, अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना राबवणार आहे. डीप क्लीनींगवर काही लोक टीका करु लागले आहेत. पण आता चीप लोकांना डीप क्लीन काय समजणार. त्यांना काय बोलायचे ते बोलतील त्यावर नरेश म्हस्के त्यांना उत्तर देतील असा टोला शिंदे यांनी लगावला.