अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेची ३ आॅगस्ट रोजी झालेली सर्वसाधारण सभा रद्द करून ती ९ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. या नव्या सभेमध्ये प्रशासनाचे दोन विषय वाढवण्यात आले आहे. ही सभा रद्द करण्यामागे महत्त्वाचा विषय जो होता, तो नव्याने घेतला आहे. आरक्षण क्रमांक-९९ मध्ये शॉपिंग मार्केट उभारण्याचा विषय यात समाविष्ट करण्यात आला आहे. केवळ एका विषयासाठी ही सभा रद्द केल्याने नेमके या शॉपिंग मार्केटमध्ये काय दडले आहे, याची चाचपणी आता नगरसेवकांकडून केली जात आहे.अंबरनाथ नगरपालिकेची सर्वसाधारण सभा कोणतेही कारण न देता रद्द झाल्याने ती का रद्द झाली, याची कारणे शोधण्यात सर्व जण व्यस्त झाले आहेत. ही सभा रद्द झाल्यावर नव्याने ९ आॅगस्टला तेच विषय असलेली सभा पुन्हा नव्याने घेण्यात आली. या नव्या सभेसाठी केवळ तीन विषय बदलले. त्यात प्रशासनाकडून दोन विषय वाढवण्यात आले आहेत. त्यातील महत्त्वाचा विषय म्हणजे महात्मा गांधी विद्यालयाच्या आरक्षित जागेवरील अतिक्रमण हटवल्यावर त्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. दुसरा विषय सीएफसी सेवांचा वापर होण्यासाठी फी आकारणे, हा घेतला आहे. मात्र, ही सभा ज्या विषयासाठी रद्द करण्यात आली, तो विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. आधीच्या सभेत आरक्षण क्रमांक-९८ या ठिकाणी नाट्यगृह, आरक्षण क्रमांक-९६ मध्ये पार्किंग व आरक्षण क्रमांक-९७ मध्ये गार्डन विकसित करणे, हे तीन आरक्षणाचे विषय होते. मात्र, नव्या सभेत या विषयांसह एक विषय वाढवत आरक्षण क्रमांक-९९ या ठिकाणी शॉपिंग सेंटर व भाजी मार्केट विकसित करण्याचा विषय मंजुरीसाठी घेतला आहे. हा विषय गेल्या सर्वसाधारण सभेत स्थगित ठेवण्यात आला होता.शॉपिंग सेंटरचा विकास कशा प्रकारे होणार आणि त्याचा लाभ कुणाला मिळणार, याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याची मागणी नगरसेवकांनी गेल्या सर्वसाधारण सभेत केली होती. मात्र, हा सविस्तर अहवाल अद्याप सादर करण्यात आलेला नसतानाही पुन्हा हा विषय मंजुरीसाठी घेण्यात आला आहे.
शॉपिंग मार्केटच्या कामात दडलंय काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 2:30 AM