कल्याण : निवडणुकीत अपंग मतदारांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी व्हीलचेअर पुरविल्या जातात. मतदानाचा दिवस संपल्यावर या व्हीलचेअरचा उपयोग करण्याऐवजी त्या प्रभाग कार्यालयातील टेरेसवर धूळखात पडून आहेत. निवडणुकीच्या कामकाजावर कोट्यवधी रुपयांचा पैसा खर्च केला जातो. त्याच पैशातून या व्हीलचेअर निवडणूक यंत्रणेने विकत घेतल्या आहेत. यासंदर्भात प्रशासनाकडून मौन बाळगण्यात येत असल्याने व्हीलचेअरचा खर्च वाया गेला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मतदारांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, ही निवडणूक यंत्रणेची जबाबदारी आहे. त्यानुसार निवडणुकीत अपंग मतदारांसाठी व्हीलचेअर खरेदी करण्यात आल्या होत्या. निवडणुकीचे काम संपल्यानंतर या व्हीलचेअरचा वापर अपंगांसाठी होणे अपेक्षित होते; मात्र त्या प्रभाग कार्यालयाच्या टेरेसवर धूळखात पडून आहेत. यासंदर्भात प्रभाग अधिकारी, महापालिकेच्या सचिवांकडे विचारणा केली असता त्यांनी या व्हीलचेअर महापालिकेने खरेदी केलेल्या नसल्याचे सांगितले. त्या धूळखात कशा पडून आहेत, याविषयी काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. अपंगांसाठी एक व्हीलचेअर अतिशय महत्त्वाची असते. एका व्हीलचेअरची किंमत ८ ते १५ हजार रुपये असते. चांगल्या कंपनीच्या व्हीलचेअरची किंमत ३५ ते ५० हजार रुपये असते. निवडणूक संपल्यावर या चेअर अपंगांना दिल्या असत्या तर त्याचा खऱ्या अर्थाने वापर झाला असता. मात्र तसे करण्यात आलेले नाही. या व्हीलचेअर पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीपर्यंत भंगार होतात. त्यानंतर निवडणूक यंत्रणा नव्याने व्हीलचेअर खरेदी करणार. जनतेच्या पैशाचा कशा प्रकारे चुराडा केला जातो, हेच यातून स्पष्ट होत समोर आले आहे.