ठाणे : टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स आणि शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालय ते घरापर्यंत पोहोचविण्याचे काम असो, अथवा परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावाच्या वेशीपर्यंत सोडण्याचे काम प्रामाणिकपणे पार पडणाऱ्या व फ्रंटलाइन वर्कर्सप्रमाणे काम करताना परिवहन विभागातील २४० हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरानाचा संसर्ग झाला. याशिवाय, ११ जणांची प्राणज्योत मालवली. असे असतानाही राज्य परिवहन सेवेच्या ठाणे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अद्यापही लसीचे संरक्षण न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सुरू उमटू लागला असून, आमचे लसीकरण कधी करणार, असा सवालदेखील विचारला जाऊ लागला आहे.
मागील वर्षी सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली होती. कधी नव्हे ते लोकल सेवादेखील पूर्णतः बंद झाल्याने अखंड धावती मुंबई, ठाणे ठप्प झाले होते. अशावेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे ठिकाण गाठणे कठीण झाले होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी यांच्यासाठी विविध ठिकाणांहून राज्य परिवहन सेवेच्या एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कडक टाळेबंदीच्या काळात फ्रंटलाइन वर्कर्सच्या खांद्याला खांदा लावून जिवाची पर्वा न करता, एसटी चालकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी ठाणे शहरातील खोपट आणि वंदना स्थानकातून जिल्ह्यातील विविध भागातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ने-आण करीत होते. कालांतराने परराज्यातील मजुरांना पोहोचविण्याची जबाबदारीदेखील एसटी महामंडळाने पार पडली. ही जबाबदारी पार पडताना, ठाणे विभागातील सुमारे २४० हून अधिक कर्मचाऱ्यांंना कोरोनाची लागण झाली, तर ११ जणांचा या आजाराने मृत्यू झाला.
दरम्यान, जानेवारी महिन्याच्या अखेरपासून फ्रंटलाइन वर्कर्स आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून ४५ ते ६० वयोगटातील व्याधिग्रस्त आणि ६० वयोगटातील ज्येष्ठांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही ठाणे परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू उमटत आहे.
....................
ठाणे परिवहन (एसटी) विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे, यासाठी आठ दिवसांपूर्वी ठाणे पालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून, त्यांनीदेखील याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येईल.
विनोदकुमार भालेराव, विभाग नियंत्रक, ठाणे