स्टार ११३९
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांतील सिग्नल, रेल्वे व बसस्थानक परिसर, स्कायवॉक तसेच लोकलमध्ये लहान मुले भीक मागताना दिसतात. पण या मुलांच्या भवितव्यासाठी, बालहक्कसंदर्भात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थांना मात्र सरकारी पातळीवरून आवश्यक ते सहकार्य मिळत नाही. त्यामुळे हा तिढा अधिकाधिक गुंतागुंतीचा होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
नोकरी, व्यवसायाच्या अपेक्षेने मुंबई, ठाणे परिसरात अनेकजण देशभरातून येतात. त्यात गोरगरीब, मजूर यांची संख्या मोठी आहे. हाताला काम न मिळाल्यास अनेकजण मुलांसह भीक मागताना पहायला मिळतात. घरातून पळून आलेली मुलेही त्यात असतात. लहान मुलांना भीक मागू नका, त्याऐवजी महापालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेण्याचा सल्ला दिल्यास ही मुले सर्वप्रथम झिडकारून पळ काढतात, रडतात, ओरडतात. त्यामुळे अनेकदा नागरिक सामाजिक कार्यकर्त्यांना हटकतात. त्यामुळे या मुलांचे पुनर्वसन व पालकांची भेट घडवण्याच्या कामात अडथळे येतात.
काही मुले अमलीपदार्थांचे सेवनही करतात. भिकाऱ्यांच्या टोळीतील मोठी मंडळी त्यांच्या बालकांना, बाळांना अफू देतात. त्यामुळे मुले तासन्तास झोपलेली असतात. मग दया येऊन येऊन नागरिक भीक देतात. बऱ्याचदा भीक म्हणून अन्नपदार्थ नको असतात तर केवळ पैसे हवे असतात.
--------------
मिळेल तेथे आसरा
- काही भीक मागणारी मुले पालकांसमवेत झोपडपट्ट्या, उड्डाणपुलांखाली जागेत, बस, रेल्वेस्थानक, प्लॅटफॉर्म येथे राहतात. परंतु, पळून आलेली मुले असतील तर ती जिथे आसरा, आडोसा मिळेल तिथे राहतात. अनेकदा पालकच मुलांना पुढे करून भीक मागतात. पळून आलेली मुले त्यांच्या मर्जीने वागतात.
- अनेकांना वेळेवर अन्न मिळत नाही. पण हाती पैसे आल्यामुळे व्यसन लागण्याची शक्यता असते. बऱ्याचदा गैरसोय असल्याचा आव आणून तसेच मळकट कपडे, अंघोळ न करणे असे राहून भीक जास्त मिळते का, याकडे त्यांचा कल असतो.
- नशेबाज मुले अफू, व्हाइटनरचे सोल्युशन हुंगून नशा करतात तर काही अन्य व्यसनांच्या मागे लागतात. दिवस कसाबसा ढकलायचा आणि रात्री मजा करून कुठे तरी झोपायचे, असेच त्यांचे आयुष्य असते.
-----------------
बालहक्क संदर्भात काम करताना सुरक्षा यंत्रणांकडून आवश्यक सहकार्य मिळत नाही. सिग्नलवर किंवा स्टेशनवरील भीक मागणाऱ्या मुलांना समज देण्याचे काम जेव्हा सामाजिक संस्था करतात, त्यावेळी अनेकदा नागरिक, सुरक्षा यंत्रणा कार्यकर्त्यांना हटकते. तसे व्हायला नको. सगळ्यांनी मिळून जर ही समस्या सोडवली तरच सुटेल, अन्यथा त्यात वाढ होईल आणि हा प्रश्न गंभीर बनेल. पोलिसांनी सामाजिक संस्थांना सोबत घेऊन काम केले तर त्याला वेग येईल.
- विजय जाधव, संस्थापक अध्यक्ष, समतोल फाउंडेशन.
---
ठाण्यात १३ ठिकाणी १५० लहान मुले भीक मागताना दिसतात. बालहक्क आयोग, त्याबाबतचे कायदे हे कागदावर असून, उपयोग नाही. त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा अशा घटना थांबणार नाहीत. अशा मुलांचे, नागरिकांचे स्थलांतर थांबवावे. भटके विमुक्त समाजातील ही मंडळी असतात, त्यांच्यावर काम व्हायला हवे. त्यांच्यासाठीही कायदे आहेत; पण त्यांची अंमलबजावणी पूर्ण क्षमतेने व्हायला हवी.
- बटू सावंत, समर्थ भारत व्यासपीठ, संस्थापक, सिग्नल शाळा उपक्रम
-------------