उल्हासनगर : एमएमआरडीएने मंजूर केलेल्या ७ रस्त्या व्यतिरिक्त इतरही रस्ते खोदून भुयारी गटार पाईप टाकण्यात येत आहे. मात्र खोदलेल्या रस्त्याच्या दुरस्तीला मुहूर्त लागत नसल्याने धूळ व वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले.
उल्हासनगरात ४२३ कोटीच्या निधीतून भुयारी गटार योजनेला मंजुरी मिळाली असून एमएमआरडीएने मंजूर केलेल्या एकून ७ रस्त्यावर भुयारी गटार पाईप टाकण्याचे काम सुरूवातील महापालिकेने सुरू केले. या मुख्य रस्ता व्यतिरिक्त इतर रस्ते खोदून गटारी पाईप टाकण्याचे काम सुरू झाले. भुयारी गटार पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या मुख्य ७ रस्त्याची दुरुस्ती करण्यापूर्वीच इतर रस्ते खोदले जात असल्याने, शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले.
या धुळीने शहर जिल्ह्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचा आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. तसेच खोदलेल्या रस्त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली आहे. महापालिका बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचे या कामावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. धुळीवर पाण्याचा फवारे मारण्याचे काम महापालिका करीत असून त्याला मर्यादा पडली आहे.
शहरात सुरू असलेली ४२३ कोटीच्या निधीतील भुयारी गटार योजना ब्ल्यूपिंट शिवाय सुरू असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जुन्या भुयारी गटार पाईप पेक्षा कमी व्यासाचे पाईप टाकले जात असल्याने, भविष्यात योजना फसण्याची शक्यता विविध राजकीय पक्षाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. आरोप-प्रत्यारोप मध्ये सापडलेली भुयारी गटार योजने बाबत आयुक्त अजीज शेख हे सविस्तर माहिती देत नसल्याने, योजना संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून भुयारी गटार पाईप टाकण्यासाठी रस्ते खोदले जात असून त्यापैकी एकाही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. आयुक्त अजीज शेख यांनी महापालिकेचे प्रमुख म्हणून खोदलेले रस्ते दुरस्ती करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देऊन नागरिकांची धुळ व वाहतूक कोंडीतून सुटका करावी. अशी मागणीही होत आहे.
रस्ता खोदल्यानंतर १८ दिवसांनी रस्ता दुरुस्ती महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी रस्ता खोडल्यानंतर १८ दिवसांनी रस्ता दुरुस्ती करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र मुख्य ७ रस्ते खोदून काही महिने झाले असून अद्यापही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. तसेच इतर रस्त्याचीही तीच अवस्था आहे. बुडगेच्या हटविण्याच्या मागणीनेही जोर पकडला आहे.