मुरबाड : मुरबाड तालुक्यातील भातपिकाला यंदा पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे कर्जाचा डाेंगर असलेल्या शेतकऱ्यांना आधारभूत खरेदी केंद्रे सुरू झाल्यावर आधार मिळेल, अशी आशा आहे. मात्र, खाजगी व्यापारी कवडीमाेल भावात खरेदी करून गेले तरी अद्याप आदिवासी विकास महामंडळाच्या भातखरेदी केंद्राच्या काट्याला मुहूर्तच सापडलेला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ दूधनोली व माळ या दोन आदिवासी सेवा सहकारी संस्थांमार्फत भातखरेदी केंद्र सुरू करते. तर, मुरबाड तालुका खरेदी-विक्री संघही शासनाने ठरवून दिलेल्या भावानुसार भातखरेदी करतो. खरेदी-विक्री संघाने मुरबाड येथे केंद्र सुरू केले आहे.
या ठिकाणी परिसरातील शेतकरी भातविक्रीसाठी आणतात, मात्र टोकावडे ते माळशेजघाट, बांडेशेत, वेळुक या परिसरातील शेतकरी ५० किमी अंतरावर असलेल्या मुरबाडला भात नेऊ शकत नाहीत. त्यांच्या सोयीचे केंद्र माळ आणि धसई ही आदिवासी विकास महामंडळाकडून सुरू केली जातात. ही दोन भातखरेदी केंद्रे सुरू करण्यात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने मेहनतीने पिकवलेला भात धसई, सरळगाव बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने विकावे लागत आहे.
शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून हाेणारी लूट थांबवण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांचा जास्त दिवस अंत न पाहता आदिवासी विकास महामंडळाला हमीभावाने भातखरेदी करण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप ठाणे जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष संतोष भांगरथ यांनी केली आहे.
‘अडीच ते तीन हजार हमीभाव द्या’अवकाळी पावसामुळे भातपिकाची नासाडी झाली असली, तरी हाती आलेल्या भातपिकाची विक्री करूनच दैनंदिन गरजा भागवाव्या लागत आहेत. शासनाने फक्त १८६८ रुपये भाव क्विंटलला जाहीर केला आहे. एक क्विंटल भाताचे पीक घेण्यासाठी कमीतकमी दोन हजारच्या पुढचा खर्च येत आहे. निदान, शासनाने अडीच ते तीन हजार रुपये दर भाताला दिला, तर शेतकरी चिंतामुक्त होईल, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहेत.