भातसानगर : शहापूर तालुक्यातील जांभे गावातील नागरिकांना चांगला रस्ता मिळणार कधी असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तालुक्यातील शहापूरपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेले जांभे हे गाव आहे. मात्र अनेक वर्षांपासून या गावात जाणारा रस्ता झालेला नाही. अनेकवेळा निवेदने दिली, अनेक नेत्यांजवळ मागणी केली मात्र आजपर्यंत या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही.तीन साडेतीन हजाराच्या आसपास या गावाची लोकसंख्या असूनही गेली अनेक दशके या गावातील नागरिक मोठमोठ्या खड्ड्यातून प्रवास करीत आहेत. या खडड्ड्यातून वाहने चालवताना अनेक अपघातही झाले आहेत. मात्र आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीने या रस्त्याची मागणी केली नाही.
याच रस्त्यावर गावात जाण्यासाठी पूल असून तोही धोकादायक झाला आहे. वर्षानुवर्षे या पुलाखालून बारमाही पाणी वाहत असूनही त्याची दुरूस्ती केली जात नाही. भविष्यात एखादी दुर्घटना घडण्याची भीती या परिस्थितीमुळे वर्तविण्यात येत आहे. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केले असले तरी या गावातील रस्ता मात्र पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत आहे. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नागरिक प्रशासनावर संतापले आहेत.गावातील रस्त्यावर गेल्या अनेक दशकांपासून खड्डेच पाहवयास मिळत असून यावरून प्रवास करणे अवघड झाले आहे.-विशाल शेलवले,ग्रामस्थ