अजित मांडकेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुले आणि तरुणांना कोरोनाची अधिक बाधा होत आहे. काही प्रमाणात या वयोगटातील रुग्णांचा मृत्यूदेखील झाल्याचे दिसत आहे. ठाण्यात ० ते १० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण हे ३ टक्क्यांच्या आसपास आहे. ११ ते २० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण हे ६.४ टक्के, तर २१ ते ३० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण १६.७ आणि ३१ ते ४० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण हे २२.१ टक्के आहे. या सर्वांना लस कधी मिळणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. केंद्राने १८ वयोगटापुढील सर्वांना १ मेपासून लसीकरण करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे उर्वरित १८ वर्षांखालील मुलांचे काय, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.ठाण्यासह विविध भागांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुले आणि तरुणांचा आकडा हा वाढताना दिसत आहे. ठाण्यात आतापर्यंत १ लाख १० हजार १७४ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातील ९४ हजार १८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १५१९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या १४ हजार ४७३ रुग्णांवर प्रत्यक्ष स्वरूपात उपचार सुरू आहेत; परंतु आता दुसऱ्या लाटेत कोरोनाने बाधित होण्यामध्ये ज्येष्ठांपेक्षा तरुण आणि लहान मुलांचे प्रमाण काहीसे वाढत आहे. एकीकडे हेल्थ वर्कर, फ्रन्टलाइन वर्कर, ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे; परंतु जे तरुण नोकरी किंवा कामाच्या निमित्ताने बाहेर पडत आहेत, त्यांचे लसीकरण अद्यापही सुरू झालेले नाही. त्यात आता या तरुण मंडळीमुळे घरातील लहान मुलेदेखील बाधित होत आहेत. त्यामुळे तरुणांकडून काळजी घेणे गरजेचे असले तरीदेखील लहान मुलांचीदेखील काळजी घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत ० ते १० वयोगटातील ३ हजार ३१४ बाधित झाले आहेत. ११ ते २० वयोगटातील ६ हजार ९१७, २१ ते ३० वयोगटातील १८ हजार १५८, ३१ ते ४० वयोगटातील २४ हजार ६४, ४१ ते ५० वयोगटातील २० हजार ५३०, ५१ ते ६० वयोगटातील १७ हजार ४११, ६० वर्षांपुढील १८ हजार ३८७ एवढे आहेत.एकूणच या सर्वांत ३१ ते ४० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण हे सर्वाधिक आढळून आले आहे. आता केंद्र सरकाराने १८ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करण्याचे निश्चित केले असून १ मेपासून या सर्वांना लस घेता येणार आहे; परंतु असे असले तरी १६ वर्षांखालील सर्वांचे लसीकरण केव्हा होणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
२० वर्षांखालील १० हजार २३१ रुग्ण; पण लसच उपलब्ध नाहीn१८ वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण आता सुरु होणार आहे. त्यासाठी आठ दिवसांचा अवधी आहे. परंतु सध्या लसींचा तुटवडा जाणवत आहे. काही ठिकाणी लसींचा साठा संपुष्टात आला आहे.nत्यामुळे १८ वर्षापुढील लसीकरण सुरु झाल्यास ठाण्यातील या वयोगटातील नागरिकांचा आकडा हा जास्तीचा आहे. त्यामुळे वेळेत लस उपलब्ध झाल्या तर लसीकरण योग्य प्रमाणात होईल, अन्यथा यांना पुन्हा वाट पाहावी लागणार आहे. n० ते १० वयोगटातील मुलांचे प्रमाणही वाढत असल्याने किंवा १७ वर्षाखालीलदेखील रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने त्यांनादेखील लस केव्हा मिळणार असा सवाल उपस्थित होत आहे.
तरुणांचे लसीकरण गरजेचे१६ ते ४५ वयोगटातील रुग्ण ४९ हजार १३९ एवढे आहेत. यामध्ये ० ते १० वयोगटातील मुलांचे मृत्यूचे प्रमाण ३ टक्के आहे. तर ११ ते २० वयोगटातील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण ६.४ टक्के, २१ ते ३० वयोगटातील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण १६.७ टक्के आणि ३१ ते ४० वयोगटातील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण २२.१ टक्के एवढे आहे. मृत्यू हे प्रमाण ज्येष्ठांच्या तुलनेत काहीसे जास्त दिसत आहे. त्यामुळे अशांचे लसीकरण हे काळाची गरज आहे. त्यामुळे लस असूनही सध्या अशा लोकांना लस दिली जात नसल्याचे दिसत आहे. केंद्राने वयानुसार लसीकरण सुरू केले असल्याने आता यांचा क्रमांक उशिराने लागत असल्यानेदेखील हा परिणाम दिसत आहे.४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे ५२ हजार २५३ रुग्णदिवसेंदिवस या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मागील काही दिवसांत हे प्रमाण दुपटीने वाढले आहे. त्यात आता १ मेपासून लसीकरणास सुरुवात होणार आहे; परंतु सध्या लसींचा पुरवठा अपुरा होत असल्याने या वयोगटातील नागरिकांना वेळेत लस मिळेल का, असा सवाल उपस्थित होत आहे.
१६ वर्षांखालील मुलांसाठी अद्यापही लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे अशा मुलांनी खरबदारी घेणे गरजेचे आहे. किंबहुना त्यांचे पालक जर घराबाहेर जात असतील तर त्यांनी घरी आल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांपासून लांबच राहणे योग्य आहे. लहान मुलांनी खेळण्यासाठी बाहेर जाऊ नये, अत्यावश्यक असल्यास बाहेर जाण्याची वेळ आली तर मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, सौम्य लक्षणे आढळल्यास तात्काळ बालरोगतज्ज्ञांना दाखविणे. - डॉ. संतोष कदम, बालरोग तज्ज्ञ