भिवंडी : भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या महासभेला मुहूर्त मिळत नसल्याने महासभा लांबली आहे. विविध कारणांमुळे महासभेची तारीख मागील आठ दिवसांत तब्बल तीन वेळा बदलण्यात आली. आता ही महासभा ३० जुलैला होणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता असल्यामुळे महासभेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक नगरसेवक महासभेची आतुरतेने वाट बघत आहेत.
बेकायदा बांधकाम व मूलभूत नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा या कारणांमुळे ही महासभा गाजणार आहे. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत महासभेची तारीख बदलत असल्याने ३० जुलैला तरी महासभा होणार का, असा सवाल नगरसेवक, अधिकारी विचारत आहेत.
पहिल्यांदा महासभा २३ जुलैला ठेवण्यात आली होती. मात्र, स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत चांगली कामगिरी केलेल्या शहरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरवण्यात येणार होते. या सर्वेक्षणात भिवंडी महापालिकेचा क्र मांक आल्याने याच दिवशी भिवंडी पालिकेचा गौरव होणार होता. भिवंडी शहरात अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य असतानाही भिवंडी पालिकेला स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत उत्तम कामगिरी केल्याबद्दल सन्मान होणे, ही बाब प्रशासनाबरोबरच नागरिकांसाठीही आश्चर्याचीच होती. मात्र, हा पुरस्कार सोहळा नेमका २३ जुलैला असल्याने या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आयुक्त अशोककुमार रणखांब व महापौर जावेद दळवी हे स्वत: हजर राहणार असल्याने २३ ला होणारी महासभा रद्द करण्यात आली. ती लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ जुलैला ठेवण्यात आली होती. मात्र, २४ जुलैला तांत्रिक अडचणीमुळे ही महासभा शुक्रवार, २६ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता ठेवण्यात आली होती.
मात्र, या दिवशी शहराला पाणीपुरवठा करणाºया स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या ठाणे गव्हर्निंग समितीची बैठक २६ जुलैला असल्याने या बैठकीत महापालिकेने स्टेम कंपनीस लावलेल्या कराबाबत व स्टेम कंपनीने महापालिकेस लावलेल्या पाण्याच्या देयकाबाबत अत्यंत महत्त्वाची बैठक असल्याचे कारण पुढे करत ही महासभा रद्द करून आता मंगळवार, ३० जुलैला दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. महासभेत कुठले निर्णय होतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.