ठाणे - सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांच्या मारहाण प्रकरणात तीन पोलीस शिपायांवर कारवाई करण्यात आली आहे. असे असले तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड होणार का, असा सवाल भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केला आहे.गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट टाकल्याचा आरोप करीत इंजिनिअर अनंत करमुसे यांना घरातून नेऊन आव्हाड यांच्या बंगल्यात मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्या वेळी मंत्री आव्हाड उपस्थित असल्याचे करमुसे यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते. ५ एप्रिल रोजी मध्यरात्री करमुसे यांना घरातून आव्हाडांच्या सुरक्षा व्यवस्थेतील तिघा पोलिस शिपायांनी नेले होते. याप्रकरणी सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नोंद झाली होती. सुमारे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या प्रकरणात वर्तकनगर पोलिसांनी कारवाई करून तिघा पोलिस शिपायांना अटक केली.या प्रकरणात सहा महिन्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्याबद्दल ठाणे पोलिसांचे डावखरे यांनी अभिनंदन केले आहे. अटक केलेल्या तिघाही पोलिस शिपायांचे करमुसे यांच्याबरोबर वैयक्तिक वाद नाहीत. त्यांनी करमुसे यांना कोणाच्या आदेशावरुन घरातून आणले. या संदर्भात कसून चौकशी होण्याची गरज आहे. त्यातून या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचा छडा लावण्याची आवश्यकता आहे. त्यातील मुख्य सुत्रधारावर कारवाई केव्हा होणार, असा सवाल डावखरे यांनी केला आहे.
अनंत करमुसे मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधारावर कारवाई कधी? निरंजन डावखरे यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 7:03 PM