ठाणे : ठाणेरेल्वे स्थानकातील बाहेरगावी जाणाऱ्या फलाटांवर दिव्यांगांसाठी विशेष शौचालय उभारण्यात आले आहे. महिना ते दीड महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असल्याने दिव्यांग प्रवाशांचे हाल होत आहेत. त्याला कुलूप पाहून ते उभारून काय फायदा असा सवाल केला जात आहे. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने या शौचालयाच्या सुरक्षा आणि स्वच्छतेच्या मुद्यावर बोट ठेवून ती व्यवस्था झाली की ते लवकरच सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.ठाणे रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वेवरील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. या स्थानकातून दिवसाला ६ ते ७ लाख प्रवासी येजा करतात. त्यामध्ये दिव्यांग प्रवाशांचाही समावेश आहे. त्यातच स्थानकातील फलाट क्रमांक २ आणि दहा येथे दिव्यांगांसाठी शौचालय आहे. तेथे येजाण्यासाठी जिने चढणे उतरणे दिव्यांग प्रवाशांसाठी जोखमीचे आहे. याबाबत दिव्यांग संस्थांमार्फत रेल्वे प्रशासनाकडे लेखी स्वरूपात तक्रारी वाढू लागल्या होत्या. त्यातच ज्या फलाटावरून बाहेरगावी जाणाºया गाड्या सुटतात. त्या फलाटावर शौचालय सुरू करण्याची मागणी पुढे आली. त्यानुसार फलाट क्रमांक ५ आणि ६ येथे मुंबईच्या दिशेला तसेच ७ आणि ८ येथे कल्याण दिशेला अशा दोन फलाटांवर प्रत्येकी एक शौचालय उभारण्यात आल्याने दिव्यांग शौचालयाची संख्या आता चार झाली आहे.नव्याने उभारलेल्या शौचालय पर्यावरणपुरक असल्याने त्या परिसरात दुर्गंधी पसरणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे. तसेच सध्या बाहेरगावी जाण्याची संख्या वाढल्याने दिव्यांगांचे शौचालय लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी आता पुढे येत आहे.५-६ आणि ७-८ या फलाटांवर उभारलेले दिव्यांग शौचालयाच्या सुरक्षा आणि स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. तो जवळपास सुटला असून फलाट क्रमांक ५-६ वरील शौचालयाची चावी त्या फलाटावर तैनात असलेल्या पॉर्इंटमॅन आणि फलाट क्रमांक ७-८ वरील शौचालयाची चावी तेथील पार्सल रूममध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लवकरच ही दोन्ही शौचालय सुरू केली जातील, अशी माहिती ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधक आर. के. मीना यांनी दिली.रेल्वे प्रशासनाने शौचालयाच्या सुरक्षा आणि स्वच्छतेच्या मुद्यावर बोट ठेवून ती व्यवस्था झाली की ते लवकरच सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
‘दिव्यांग’ शौचालयांचे उद्घाटन कधी? ठाणे स्थानकातील प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 12:59 AM