उल्हासनगर : शहरातील आठ रस्त्याच्या कामाला मुहूर्त निघत नसल्याने नागरिकांसह वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता बांधणीनंतर देखभालीची जबाबदारी तीन वर्ष कंत्राटदारावर राहणार आहे. केवळ ८० टक्के बिल देण्याची तरतूद आयुक्तांनी निविदेत केली असून प्रत्येक रस्त्याच्या कामाचे सर्वेक्षण सरकारी संस्था करणार आहे.उल्हासनगरातील रस्ते चकाचक करण्यासाठी पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी आठ रस्त्यांची निवड केली. त्यानुसार निविदा काढल्या. मात्र रस्त्याच्या कामाला मुहूर्त निघाला नसल्याची माहिती शहर अभियंता रामप्रसाद जैस्वाल यांनी दिली. आठही रस्त्याचे काम एप्रिलमध्ये प्रत्यक्षात सुरु करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. वादात सापडलेला शहाड ते पालिका रस्त्याचे काम अखेरच्या टप्यात असल्याचे सांगितले. आयुक्तांनी निविदेच्यावेळी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सलग तीन वर्ष दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारावर असेल. रस्ता बांधणीनंतर फक्त ८० टक्के बिल दिले जाणार असून २० टक्के बिल तीन वर्षात टप्याटप्याने दिले जाईल. शहरात असे प्रथमच घडत आहे. याप्रकाराने निकृष्ट रस्ता बांधणीला आळा बसून त्याच त्या रस्त्यावर व दुरुस्तीसाठी लाखोचा खर्च पालिकेला करावा लागणार नाही. महापालिकेने आठ रस्त्यांच्या बांधणीसाठी २३ कोटी ७५ लाखाची तरतूद केली. मोर्यानगरी ते व्हीटीसी ग्राउंड रस्त्याचे काम मध्यंतरी सुरु झाले होते. मात्र महापालिका निवडणुकी दरम्यान बंद ठेवले. त्याला गती देण्यात येणार असल्याची माहिती जैस्वाल यांनी दिली. प्रत्येक रस्त्याची पाहणी आयुक्त निंबाळकर पथकासह करणार आहे. तसेच रस्त्याच्या कामाचे नमुने सरकारी प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी?
By admin | Published: March 15, 2017 2:23 AM