ठाणे : पोलिसांचा खून करणाऱ्या गँगस्टरला सोबत घेऊन ठाण्यात गुन्हेगारी कारवाया करणारे ठामपाच्या सहायक आयुक्तांवरील कारवाईला दिरंगाई कशामुळे होत आहे, असा सवाल ठाणे काँग्रेसचे माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी पोलिस आयुक्त जयजित सिंग यांना बुधवारी पत्राद्वारे केला.
चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे की, जे.जे. हॉस्पिटल हत्याकांडात दोन पोलिसांची झालेली हत्या आणि उल्हासनगर येथील घनश्याम भतिजा, इंदर भतिजा हत्या प्रकरणात दोन पोलिसांची हत्या झाली होती. यामध्ये दोषसिद्धी झालेल्या कुविख्यात गुंडाबरोबर संबंध ठेवून त्याच्या मदतीने गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या पालिकेच्या सहायक आयुक्तांवर कारवाईला दिरंगाई म्हणजे पोलिस खात्यास शरमेची बाब आहे.
पोलिसांची हत्या करणाऱ्यांवर जर पोलिस राजकीय दबावाखाली कारवाई टाळत असतील तर सामान्यांबरोबरच पोलिसांवरही अन्याय आहे. मुजोर कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारावा आणि मयत पोलिसांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.