बदलापूर : एकीकडे अंबरनाथ रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे काम बदलापूरच्या नंतर सुरू होऊन पूर्णही झाले, तरी बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचे काम मात्र अजूनही अर्धवट अवस्थेत रखडून पडले आहे. या सगळ्याला राजकीय उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप बदलापूरवासीय करीत आहेत.
बदलापूर शहराला होम प्लॅटफॉर्म मिळावा या हेतूने बदलापूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागात होम प्लॅटफॉर्मचे काम मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आले होते. मात्र हे काम मागील अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत रखडून पडले आहे. या प्लॅटफॉर्मसाठी जी जागा लागणार होती, तिचं अधिग्रहण न करताच प्लॅटफॉर्मच्या कामाला सुरुवात झाली. मात्र या सगळ्यात कामाचा महत्त्वाचा वेळ निघून गेला आणि हे काम रखडून पडले. या कामासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वारस्य दाखवून हस्तक्षेप केला असता, तर हे काम कधीच पूर्ण झाले असते. एकीकडे अंबरनाथ रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे काम बदलापूरच्या मागून सुरू होऊन पूर्णत्वास आले आहे. तर दुसरीकडे बदलापूरचे काम अर्धवट अवस्थेत रखडून पडले.
या सगळ्याबाबत खासदार कपिल पाटील यांना विचारले असता प्लॅटफॉर्मसाठी लागणाऱ्या जागेचे हस्तांतरण बाकी असल्याने हे काम रखडल्याचे त्यांनी मान्य केले.
कुठलेही मोठे विकासकाम अशा पद्धतीने रखडत असेल आणि तो गुंता प्रशासकीय पातळीवर सुटत नसेल, तर स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यात मध्यस्थी करून ते काम मार्गी लावणे गरजेचे असते. मात्र त्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती बदलापूरच्या लोकप्रतिनिधींमध्ये दिसत नाही, अशा शब्दांत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
------------------------------------------