स्टार १२१८
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे लसीचे दुसरे प्रमाणपत्र व आधारकार्ड सादर करून लोकलचा पास दिला जात आहे. मात्र, उपनगरी विभाग वगळता दररोज मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक मार्गावर नोकरी, व्यवसायानिमित्त ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी अद्याप मासिक पास सेवा सुरू केलेली नाही. त्यामुळे या प्रवाशांना प्रवासासाठी आर्थिक भुर्दंड पडत आहे. त्यामुळे पुन्हा पासाची मुभा कधी मिळणार, असा सवाल हे प्रवासी करत आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० मध्ये लॉकडाऊनमध्ये लोकल व लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोरोना रुग्ण घटल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढली आहे. मुंबईत लोकल सेवाही सुरू झाली आहे. मात्र, त्यासाठी दोन लसींची अट आहे. त्याशिवाय पास अथवा तिकीटही मिळत नसल्याने सर्व प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. मुंबई-पुणे, मुंबई-नाशिकदरम्यान अप-डाऊन करणाऱ्यांनाही पास सुविधा रेल्वेने सुरू केलेली नाही.
लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवासासाठी आरक्षित तिकीट काढावे लागत आहे. पूर्वीप्रमाणे थेट जनरल डब्याचे तिकीट काढून प्रवास करता येत नाही. परंतु, आरक्षित तिकिटे आधीच फुल होत असल्याने अनेकांच्या पदरी निराशा पडत आहे. यामध्ये वेळ, पैसा खर्च होत असून राज्यातील निर्बंध कमी झालेले असताना रेल्वे सेवा पूर्वीप्रमाणे सुरळीत कधी होणार, असा सवाल प्रवाशी करत आहेत.
---------
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
सिद्धेश्वर एक्स्प्रेस
मुंबई- पुणे विशेष रेल्वे
मुंबई-नांदेड विशेष रेल्वे
मुंबई-नागपूर सेवाग्राम विशेष
मुंबई-हैदराबाद
मुंबई-दिल्ली
मुंबई-सावंतवाडी
मुंबई-वारणसी
------------
मुंबईत सवलत, आम्हाला का नाही?
मुंबईत लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मासिक पास दिला जात आहे. मग आम्हाला का नाही, असा सवाल पुणे, मनमाड, नाशिक तसेच अन्य कमी अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केला आहे. रेल्वे प्रशासनाने यावर विचार करून समस्या सोडवावी.
------------
भुर्दंड किती दिवस सहन करायचा?
मुंबईत केवळ मासिक पास दिला जात आहे; परंतु तेथील प्रवासी तिकीट देण्याची मागणी करत आहेत, तर जिथे केवळ तिकीट दिले जात आहे, तेथील नागरिकांना पास हवा आहे. राज्य सरकारने नागरिकांची समस्या जाणून घेत त्यांना दिलासा द्यायला हवा. समस्या सोडवणे महत्त्वाचे आहे. गुंता वाढवणे अपेक्षित नाही, यावर गंभीर्याने विचार व्हायला हवा. पास, तिकीट सगळे पुन्हा पूर्वीसारख मिळायला हवे.
- मनोहर शेलार
----------
दिवा-वसई, पनवेल मार्गावर मेमू गाड्या पुन्हा सुरू होणार आहेत, पण या मार्गावरील प्रवाशांना तिकीट, पास मिळायला हवे. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, असे निर्णय घेणे गरजेचे आहे, पण तसे होताना दिसत नाही. राज्य सरकार, रेल्वे या यंत्रणांनी प्रवाशांना अपेक्षित सेवा द्यायला हव्यात. प्रवासी पैसे मोजत असल्याने तो त्यांचा हक्क आहे.
- ॲड. आदेश भगत, दिवा.
------------
कोविड सुरू झाल्यापासून काही निर्णय घेण्यात आले होते, त्यातील बहुतांशी निर्णय हळूहळू शिथिल करण्यात आले आहेत. लवकरच सगळे सुरळीत होण्याची शक्यता असून, पूर्वीप्रमाणे सगळे व्यवहार होतील. रेल्वे बोर्ड, केंद्र, राज्य सरकार, आदी मिळून निर्णय घेतात, त्याचे पालन केले जाते.
- रेल्वे प्रशासन
--------------