अंबरनाथ असो वा बदलापूर, या दोन्ही शहरांत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. वाढत्या नागरीकरणामुळे या दोन्ही शहरांसाठी स्वतंत्र नाट्यगृहांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. राज्य शासनाने त्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. मात्र, या दोन्ही शहरांना केवळ नाट्यगृहाची नव्हे, तर बहुउद्देशीय नाट्यगृहाची गरज आहे. नाटकांसोबत इतर कार्यक्रमांसाठी हे नाट्यगृह वापरण्याची सुविधा मिळाल्यास येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे केंद्र बनवणे शक्य होईल. अंबरनाथ आणि बदलापूर ही जुळी शहरे असली तरी लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिल्यास अंबरनाथ शहर बहुभाषिक म्हणून ओळखले जाते. तरीही मराठमोळ्या संस्कृतीला साजेशा कार्यक्रमांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक कलाकार अंबरनाथमधून घडले आहेत. बदलापूर शहराचा विचार केल्यास या शहराने आजही गावपण जपलेले आहे. त्यातच मुंबई, ठाणे आणि डोंबिवली-कल्याण भागांतील मराठी भाषिक मोठ्या संख्येने या शहरांत वास्तव्यास आले आहेत. कला आणि सांस्कृतिक कार्यात बदलापूरने नावलौकिक प्राप्त केला आहे. मुंबई, ठाणे आणि डोंबिवलीनंतर मराठमोळी संस्कृती आणि तिच्याशी निगडित कार्यक्रमांची संख्या सर्वाधिक येथेच आहे.सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांना मात्र या शहरांत कार्यक्रम आयोजित करताना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. कार्यक्रमांसाठी खाजगी सभागृहाची व्यवस्था करावी लागते. शहरे वाढत असली व त्यांची सांस्कृतिक ओळख दृढ होत असतानाही दोन्ही शहरांतील पालिकांकडे आपले सभागृह नाही. नाट्यरसिकांसाठी शहरांत नाट्यगृह उभारणे हे जसे गरजेचे आहे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बंदिस्त सभागृह असणे गरजेचे आहे. बदलापूर पालिकेने कात्रप चौकात खाजगी बांधकाम व्यावसायिकाला आरक्षण विकासाच्या नावावर भूखंड दिला असला, तरी त्या मोबदल्यात पालिकेला तळ मजल्यावर जे सभागृह बांधून देणे गरजेचे होते, तेच सभागृह बांधकाम व्यावसायिकाने तिसऱ्या मजल्यावर तयार करून दिले आहे. तिसऱ्या मजल्यावर सभागृह मिळाल्याने त्याचा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हवा तसा वापर करणे अवघड आहे. लिफ्ट बंद ठेवल्यामुळे रसिकांना जिने चढून सभागृहात जावे लागते. मोक्याच्या भूखंडाच्या मोबदल्यात पालिकेला हक्काचे सभागृह तळ मजल्यावर न मिळाल्याने रसिक प्रेक्षकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातही, हे सभागृह खाजगी संस्थेला चालवण्यासाठी दिल्याने त्याचे दर लहान कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना परवडणारे नाहीत. रसिकांसाठी पालिकेने स्वत: सभागृह उभे करण्याची तयारी ठेवली आहे. नाट्यगृहासाठी निधी येऊन पडला असला, तरी नाट्यगृहाची जागा अपुरी पडत असल्याने हे कामदेखील रखडलेल्या अवस्थेत आहे. शहराला नाट्यगृहाची गरज असली, तरी इतर शहरांनी जी नाट्यगृहे उभारली आहेत, त्यांची देखभालीअभावी झालेली दुरवस्था पाहता अंबरनाथ आणि बदलापुरातील नाट्यगृह नीटनेटके ठेवणे पालिकेला अवघड जाणार आहे, हे स्पष्ट दिसत आहे. सध्या नाशिकमधील नाट्यगृहाच्या अस्वच्छतेचा मुद्दा सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी ऐरणीवर आणला आहे. डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची स्थिती तशीच आहे. नाटकांना शनिवार आणि रविवारव्यतिरिक्त गर्दी होत नसल्याने इतर दिवशी नाट्यगृह बंद ठेवण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत शहरात केवळ नाट्यगृहाऐवजी बहुउद्देशीय नाट्यगृहाची सर्वाधिक गरज आहे. नाटकांच्या प्रयोगासोबत इतर कार्यक्रमांसाठी सभागृह मिळाल्यास त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च निघेल. अंबरनाथमध्येही बहुउद्देशीय नाट्यगृहाचीच गरज आहे. शिवाजी चौकात सुरू असलेल्या खुल्या नाट्यगृहाचे काम आजही अपूर्णावस्थेत आहे. किमान ते तरी रसिकांसाठी खुले करून देणे गरजेचे आहे. केवळ नाट्यगृहाची भपकेबाज वास्तू तयार न करता सर्व छोट्यामोठ्या कार्यक्रमांसाठी कमीतकमी दरात नेटके सभागृह उपलब्ध झाले, तर लोकांची सांस्कृतिक भूक भागेल.
बहुउद्देशीय नाट्यगृहाची उभारणी कधी होणार?
By admin | Published: January 23, 2017 5:17 AM