लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोनाचे सावट कायम असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सामान्यांना लोकलमधून प्रवास करण्यास मनाई आहे. आमच्यासाठी लोकल सुरू करा अशी मागणी सातत्याने संबंधित आणि प्रवासी संघटनांकडून होत असताना सरकारने कोणताही ठोस निर्णय आजवर घेतलेला नाही. परंतु निकड पाहता नोकरी आणि पोटापाण्यासाठी जोखीम पत्करून सामान्य नागरिकांचा प्रवास सुरू असल्याचे दिसून आले. रविवारी डोंबिवली रेल्वे स्थानकाचा आढावा घेता असता अनेक कुटुंबं पोराबाळांसह लोकलमधून प्रवास करताना दिसून आली. यावेळी टीसी मात्र फलाटावर दिसून आले नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना प्रवास करण्यास बंदी असताना फेरीवाले, भिकारी, तृतीयपंथी यांना प्रवास करण्यास मुभा कशी, असा सवालही संबंधितांकडून केला जात आहे.
डोंबिवली स्थानक सर्वात गर्दीच्या स्थानकांमध्ये मोडते. परंतु सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास परवानगी असल्याने एरवी फलाटावर ओसंडून वाहणारी प्रवाशांची गर्दी दिसून येत नाही. डोंबिवली स्थानकाची पाहणी करता लोकलमध्ये सर्वसामान्य नागरिक काही प्रमाणात दिसून आले. स्थानकातील फलाटावरून मार्गस्थ होणाऱ्या यातील काही प्रवाशांशी बातचीत केली असता प्रारंभी त्यांनी बोलण्यास नकार दिला. तुमच्या भावना मांडण्यासाठीच हा प्रयत्न सुरू असल्याचे सांगताच त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर बोलणे सुरू केले. कोरोनामध्ये नोकरी गेली; परंतु खूप कष्टाने दुसरी नोकरी मिळाली आहे. रस्ते मार्गे प्रवास करून जाणे परवडणारे नसल्याने लोकलचा आधार घेऊन जोखमीचा प्रवास गेल्या काही दिवसांपासून करीत आहोत. खिशात दोनशे तर अडीचशे रुपये ठेवून प्रवास करीत आहोत. कारण रस्त्याने प्रवास करताना रोजचा सातशे ते आठशे खर्च येण्यापेक्षा टीसीने पकडताच दोनशे ते अडीचशे रुपये दिले तरी ते परवडणारे आहे. टीसी थोडाच दररोज पकडणार आहे अशीही भावना संबंधित सामान्य प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली, तर दुसऱ्या प्रवाशाने लवकरात लवकर लोकलने प्रवास करण्यास सर्वसामान्यांना परवानगी द्यावी. चोरून प्रवास कधीपर्यंत करायचा, याकडे लक्ष वेधले.
------------------------------------
आमची कारवाई सुरूच आहे
जोपर्यंत सरकार परवानगी देत नाही तोपर्यंत आमची सर्वसामान्य प्रवाशांविरोधातील कारवाई सुरूच राहणार आहे. आमची कारवाई सुरूच आहे. फलाट तिकीट देणेही बंद केले आहे अशी माहिती उपसहप्रबंधक जी. के. साहू यांनी दिली.
------------------------------------------------------