लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहनसेवेची (केडीएमटी) बस पूर्वेतून रेल्वे स्थानकाबाहेरून सोडण्याबरोबरच महिला विशेष बस सुरू करण्याची घोषणा तत्कालीन सभापती भाऊ चौधरी यांनी केली होती. मात्र, त्या कागदावरच राहिल्या आहेत. केडीएमटीचे विद्यमान सभापती संजय पावशे यांनी या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी जोर धरत आहे.केडीएमटीच्या बस रेल्वेस्थानक परिसरातून सोडण्यासाठी महापालिकेने स्थानकासमोरील रस्त्याचे रुंदीकरण केले. या कारवाईत एका इमारतीचा काही भाग तोडण्यात आला. त्यात एक हॉटेल आणि दोन गाळे काही प्रमाणात रस्त्यात गेले. मात्र, या मोकळ्या झालेल्या जागेचा ताबा फेरीवाल्यांनी बळकावला आहे. त्यामुळे हे रुंदीकरण कोणासाठी केले, असा सवाल नागरिक करत आहेत.स्टेशनलगत असलेला डॉ. राथ रोड आणि नेहरू रोड तसेच बाजीप्रभू चौकात फेरीवाल्यांचेच सामा्रज्य आहे. केडीएमसीतील सत्ताधारी शिवसेनेने डॉ. राथ रोडवरील फेरीवाला हटवण्याचा प्रयत्न केला असला, तरीही तो स्टंट असल्याची सर्वत्र चर्चा आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करून त्या मोकळ्या जागेतून तातडीने बससेवा सुरू करायला हवी होती. पण, तसे न झाल्याने केडीएमटी आणि महापालिका प्रशासनात इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डोंबिवली स्थानकातून बस सुटणार कधी?
By admin | Published: June 10, 2017 1:03 AM