कल्याण : नागरिकांकडील प्लास्टिक संकलित करण्यासाठी केडीएमसीने केंदे्र उघडल्याची घोषणा केली आहे. मात्र, सध्या कल्याणमध्ये दोनच संकलन केंद्र सुरू आहेत. तर, डोंबिवलीत केंद्र सुरू करण्यासाठी अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे ‘आम्ही प्लास्टिक जमा तरी कुठे करायचे?,’ असा सवाल नागरिक करत आहेत. दुसरीकडे, प्लास्टिक बंदीची जागृतीही प्रभावीपणे न झाल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्येही गोंधळ आहे.राज्य सरकारने शनिवारपासून प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. या बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना केडीएमसीकडूनही कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे प्लास्टिक संकलनासाठी धर्तीवर महापालिका प्रशासनाने कल्याण-डोंबिवली शहरात संकलन केंद्र उघडल्याचे जाहीर केले आहे. कल्याणमध्ये आधारवाडी अग्निशमन दलाशेजारी, सुभाष मैदान, बेतुरकरपाडा स्वानंदनगर मैदान, ओक हायस्कूल, पारनाका श्रीराम भुवन, डोंबिवलीतील महात्मा गांधी रोडवरील समतोल इको वर्क्स, हळबे व्यायामशाळा, कोपर रोड मल उदंचन केंद्र , सोनारपाडामधील मातोश्री ट्रस्ट आदी नऊ ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचे संकलन केंद्र उभारली असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. नागरिकांनी आपल्याजवळील प्लास्टिकच्या पिशव्या तेथे जमा कराव्यात, असे आवाहनही घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आले आहे. परंतु, सध्या कल्याणमधील आधारवाडी अग्निशमन मुख्यालयाच्या शेजारी आणि सुभाष मैदान अशा दोनच ठिकाणची संकलन केंद्रे सुरू आहेत. डोंबिवली शहरासह अन्य ठिकाणची केंद्रे मात्र अजूनही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे प्लास्टिक जमा करायचे तरी कुठे?, या विंवचनेत नागरिक आहेत. ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून रविवारी प्लास्टिकचे संकलन केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात केले जाते, पण प्रशासनाने कायमस्वरूपी केंद्र चालू करणे गरजेचे होते. कल्याणप्रमाणे येथे कायमस्वरूपी केंद्र का सुरू केले नाही, असा सवाल केला जात आहे.केडीएमसीने जुलै २०१७ पासूनच प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला होता. पण पुरेशा जागृती अभावी ही बंदी कागदावरच राहिली. सध्या सरकारने बंदी जाहीर केली असलीतरी त्याच्या जागृतीबाबतही केडीएमसीला वावडे असल्याचे स्पष्ट होत आहे. प्लास्टिकबंदीची जागृती करणारे होर्डिंगही महापालिकेने लावलेले नाही.
प्लास्टिक जमा करायचे तरी कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 1:47 AM