- नितिन पंडीत
भिवंडी: शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहराची वाताहात झाली असून खड्डेमय रस्त्यातून प्रवास करतांना प्रवाशांसह वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे शहरात असलेल्या धामणकरनाका , कल्याणरोड , तसेच वंजारपट्टी नाका या ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलांवर देखील खड्डे पडले असल्याने उड्डाणपुलावरून प्रवास करणे देखील धोक्याचे झाले आहेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे भिवंडी शहराच्या मुख्य रस्त्यावर 2006 मध्ये बनविण्यात आलेल्या अडीच किलोमीटर लांबीच्या स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपुलाची दुरवस्था होऊन तब्बल तीन वर्षे हा उड्डाणपूल अवजड वाहनां साठी बंद करून शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष भगवान टावरे यांनी दिला आहे. गुरुवारी राष्ट्रवादीच्या शहरातील मुख्य कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत टावरे बोलत होते.
स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपूल २००६ मध्ये जे कुमार या ठेकेदार कंपनीने बनवीत असताना या उड्डाणपुला वरील जाडी ही निवदा मध्ये नमूद मोजमापा पेक्षा सहा इंच कमी केली ज्यामुळे या उड्डाणपुलावर भगदाड पडून दुरवस्था झाली .त्यानंतर या उड्डाणपुलाच्या दुरुस्ती साठी या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने बेरिकेटिंग करून अवजड वाहतुकीस बंद केला .ही बाब आय आय टी मुंबई यांनी केलेल्या स्ट्रक्चर ऑडीट मध्ये उघडकीस आली परंतु त्यावर कारवाई न करता शासनाने या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी ७ कोटी १३ लाख ७४ हजार ७९ रुपयांची हर्क्युलस स्ट्रक्चर सिस्टीम या ठेकेदार कंपनीची निविदा २० सप्टेंबर २०१९ मध्ये मंजूर करून १२० दिवसात हे काम पूर्ण करण्याचे कार्यदेश दिले आहेत.
परंतु आज ही या उड्डाणपुलाची दुरुस्ती काम सुरू न केल्याने शहरातील नागरीक वाहनचालक यांना मनस्ताप सहन करावा लागत असून ,या निविदेची मुदत संपून ही काम न करणाऱ्या ठेकेदारास निलंबित करून त्यास पाठीशी घळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून, शहरातील नागरीकांच्या मनस्तापाचा अंत न पाहता महानगरपालिका प्रशासनाने उड्डाणपुलाची दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष भगवान टावरे यांनी केली आहे. त्यासंदर्भातील लेखी पत्र देखील टावरे यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे . या प्रसंगी सरचिटणीस अँड सुनील पाटील ,जब्बार काझी , युसूफ सोलापूरकर ,रसूल खान, नुमान बाऊहुद्दीन आदी पदाधिकारी उपस्थित होते .