ठाणे :
ठाण्यातील विविध भागांत रातोरात भाजपचे किरीट सोमय्या यांचे बॅनर लागले आहेत. कुठे गायब झाले ‘किलीट तोमय्या’, आपण यांना पाहिलंत का, अशा आशयाचे हे बॅनर झळकत असून, त्यात सोमय्या यांचा तुरुंगातील फोटोही दिसत आहे. ठाण्याच्या राजकीय वर्तुळात सध्या हा चर्चेचा विषय आहे. हे बॅनर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यकर्त्यांनी लावल्याचा मेसेजही सोशल मीडियावर व्हायरल झाला.
काही महिन्यांपूर्वी ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार गायब असल्याचे बॅनर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आले होते. यामागे भाजपचा अप्रत्यक्ष हात असल्याचे दिसून आले होते. काही महिन्यांपूर्वी आमदार सरनाईक यांचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात आल्याने खळबळ उडाली होती. त्याच वेळी सरनाईक गायब झाल्याचे बॅनर लावण्यात आले होते. आता किरीट सोमय्या यांच्यामागे आयएनएस विक्रांत प्रकरणात चौकशीचा ससेमिरा आहे. बुधवारी त्यांना न्यायालयाने दिलासाही दिला. मात्र, तत्पूर्वी मंगळवारी रात्रीच ते गायब झाल्याचे बॅनर ठाण्यात झळकविण्यात आले. सरनाईक यांच्याविरोधात किरीट सोमय्यांसोबत आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांच्या घर व कार्यालयासमोर हे बॅनर लावल्याचे सरनाईक यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. या संदर्भात सरनाईक यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाइल फोन बंद होता.