कल्याण : पश्चिमेतील रेल्वेस्थानक परिसरातील स्कायवॉकची दुरुस्ती महापालिकेने अद्याप केलेली नाही. मात्र, महापालिकेकडून दुरुस्ती केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे महापालिकेने कशाची दुरुस्ती केली. कोणत्या दुरुस्तीच्या कामावर १५ लाख रुपये खर्च केले, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
मुंबईतील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर कल्याणच्या स्कायवॉकचा मुद्दा चर्चेला आला आहे. कल्याण रेल्वेस्थानकातील कर्जतच्या दिशेने सुरू होणारा स्कायवॉकचा एक मार्ग हा फुले चौकात, तर एक मार्ग दीपक हॉटेलजवळ उतरतो. या पुलाच्या खालचा भाग कधीच खाली पडला आहे. त्यामुळे पूल पादचाऱ्यांसाठी सुरक्षित नाही, असा मुद्दा उपस्थित केला गेला. त्यामुळे महापालिकेने १५ लाख रुपये खर्चून पुलाची दुरुस्ती केली जाईल, असे सांगितले. याबाबत, पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता पुलाच्या दुरुस्तीवर १५ लाख खर्च केले आहेत, असे सांगितले.
पुलाची दुरुस्ती केली असतानाही दुरवस्था झालेल्या भागाकडे दुर्लक्ष कसे झाले? महापालिकेने नेमकी कशाची दुरुस्ती केली. ही दुरुस्ती कागदोपत्री दाखवली गेली आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहे. हा स्कायवॉक २०१० पासून वापरात आहेत. आठ वर्षांत त्याच्या दुरुस्ती देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे.