- सदानंद नाईक उल्हासनगर : उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या विकास कामाच्या लोकार्पण कार्यक्रमाला जाणे टाळणारे माजी आमदार पप्पु कलानी हे त्याचं दिवसी रात्री खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गाडीत बसून निघून गेल्याने, विविध चर्चेला उधाण आले. शहर विकासासाठी निधी मिळण्यासाठी कलानी मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गाडीत गेल्याची माहिती कलानी यांचे कट्टर समर्थक कमलेश निकम यांनी दिली आहे.
उल्हासनगर पूर्वेतील विकास कामाचे लोकार्पण करण्यासाठी रविवारी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माजी आमदार पप्पु कलानी यांच्या समर्थकांनी बिर्ला गेट येथे सकाळी जंगी स्वागत केले. मात्र पप्पु कलानी, ओमी कलानी व पंचम कलानी यांनी पवार यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचे टाळले. त्याच दिवशी रात्री शहरातील एका स्थानिक नेत्यांच्या मुलांच्या लग्नात मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी माजी आमदार पप्पु कलानी हे समर्थकासह लग्नात उपस्थित होते. लग्न समारोह संपन्न झाल्यावर पप्पु कलानी हे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गाडीत बसून निघून गेले. खासदार शिंदे यांच्या गाडीत कलानी बसून निघून गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर विविध चर्चेला उधाण आले.
शहरातील राजकारण गेल्या ४ दशका पासून माजी आमदार पप्पु कलानी यांच्या भोवती फिरत असून बहुतांश राजकीय पक्षाच्या नेत्यांनी महापालिका सत्तेसाठी कलानी यांच्या घराचे उंबरठे झिजविले आहे. कलानी यांचा पाठिंबा ज्या पक्षाला असेल त्याचा विजय निश्चित मानला जातो. कल्याण लोकसभेसह उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात कलानी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. उल्हासनगर महापालिका ताब्यात घेण्यासाठी कलानी शिवाय कोणत्याच पक्षाला पर्याय नाही. त्यामुळे कलानी यांना महत्त्व प्राप्त झाले. कलानी हे शहर विकासासाठी निधीची मागणी करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गाडीत बसले होते. अशी माहिती कलानीचे कट्टर समर्थक कमलेश निकम यांनी दिली.
आमदार आयलानी यांची आमदारकी धोक्यात? माजी आमदार पप्पु कलानी यांनी महायुती मधील शिंदे गटात प्रवेश केल्यास, ते उल्हासनगर विधानसभेवर दावा ठोकणार आहेत. कलानी यांच्या प्रवेशामुळे आयलानी यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीतील नेत्यांना लोकसभेला कलानी हवे, विधानसभा निवडणुकीला नको. अशी त्यांची भूमिका आहे.