भिवंडी/कल्याण : मागील निवडणुकीवेळी भाजपची घोषणा होती, कुठे नऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? आज तोच प्रश्न आम्ही त्यांना विचारतोय. मुलभूत सुविधाही तुम्ही पुरवू शकलेला नाहीत. खासगीच नव्हे, तर ३० टक्के सरकारी नोकºयाही जाण्याची वेळ आली आहे. सरकारच्या कामगिरीबद्दल लोकांच्या मनात चीड आहे. ती बाहेर काढण्यासाठी आम्हाला संधी द्या. आम्ही तुमच्या वतीने विरोधक म्हणून सरकारला जाब विचारू, अशी भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी भिवंडी आणि कल्याणच्या सभेत मांडली. पावसामुळे दोन्ही सभांत व्यत्यय आला असला, तरी नंतर त्या व्यवस्थित पार पडल्या.
दोन्ही शहरांतील खड्डे, वाहतूक कोंडी यांचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी स्मार्ट सिटी योजनेतील अपयशावर बोट ठेवले. कल्याण-डोंबिवलीसाठी घोषित केलेले ६,५०० कोटींचे पॅकेज कुठे गेले, अशी विचारणा त्यांनी केली. सध्या शहरांची दैना उडाली असली, तरी नागरिकांना चीड कशी येत नाही, मेक्सिकोत ज्या पद्धतीने मंत्र्याला फरपटत नेले, तसे तुम्ही पेटून उठणार की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.मी परप्रांतीयाबद्दल आंदोलने केली, तर त्याला भंपक प्रसिद्धी दिली जाते, पण गुजरातमधून मराठी माणसांना पिटाळून लावणाºया कल्पेश ठाकूरला मात्र भाजपमध्ये मानाने प्रवेश दिला जातो. तेथील परप्रांतीयांविरोधातील आंदोलने दाबली जातात, असा आरोप ठाकरे यांनी केला.
सभेच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी उभ्या असलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या पाहून प्रत्येक वेळी मी आग लावतो, असे नाही असा टोलाही त्यांनी लगावला.काही पत्रकार खोचकपणे माझ्यावर आंदोलने अर्धवट सोडल्याची टीका करतात. पण असे एकतरी आंदोलन दाखवून द्यावे, असा प्रश्न करत राज ठाकरे यांनी मनसेमुळेच टोलमुक्ती झाल्याचा दाखला दिला.ज्या भाजप-शिवसेनेने टोलमुक्तीचे आश्वासन मागील निवडणुकीत दिले होते, ते पाळले नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला. उलट त्या सरकारमधील मंत्री नितीन गडकरी टोलमुक्ती कशी शक्य आहे, असा प्रश्न विचारत असल्याकडे राज यांनी लक्ष वेधले.'राज्याच्या प्रश्नावर निवडणूक लढवा'बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, नागरी समस्या आदी राज्याच्या समस्यांवर निवडणूक लढवा, असे आव्हान राज ठाकरे यांनी या सभांतही सत्ताधाऱ्यांना दिले. ३७० कलमासारखे मुद्दे उपस्थित करायचे, देशभक्तीच्या नावे भावना घरंगळत न्यायच्या हा यांचा अजेंडा आहे. त्यापेक्षा राज्याच्या प्रश्नावर निवडणूक लढवायला हवी. सत्ताधारी तसे करत नसतील, तर मतदारांनी त्यांना जाब विचारायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.