ठाणे: पुर्व प्राथमिक शिक्षकांचे काम अवघड, कठिण असते. त्या वयात मुलांना समजून घ्यावे लागते. पालक जिथे जागरुक नाही तिथे मुलांच्या शिक्षणाची सगळी भिस्त शिक्षकांवर असते. एक पिढी या शिक्षकांच्या हातात असते. प्रत्येक पालकांचे स्वप्न असते त्याच्या मुलाने नावलौकीक मिळवावा आणि हे स्वप्न फुलवण्याचे काम शिक्षकांचे असते असे मत भाषाविभागाच्या उपसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे यांनी व्यक्त केले.
सरस्वती मंदिर पूर्व प्राथमिक विभागाच्यावतीने शनिवारी ‘निपुण भारत अभियान’ ध्येये आणि पायाभूत साक्षरता - संख्याज्ञान सजगता कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. आवटे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अशोक टिळक, त्यांच्या पत्नी मनीषा टिळक, सरस्वती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र दिघे, सुमीता दिघे, ज्येष्ठ लेखिका रेणू दांडेकर, सरस्वती मंदिर पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रती भोसेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. ‘निपुण भारत अभियान’ विषयी सांगताना डॉ. आवटे म्हणाल्या की, पुर्व प्राथमिकची तीन वर्षे आणि पहीली आणि दुसरी इयत्तेला भाषा आणि अंकश्सास्त्रावर जोड दिला आहे. तिसरीपर्यंत मातृभाषेतच मुलांना शिक्षण द्यावे नाहीतर त्यांचा गोंधळ उडो. मुले लहान वयात भाषा शिकतात आणि ते पुढे निपुण होतात. या अभियानात जुन्या गोष्टी शास्त्रोक्त पद्धतीने मांडल्या आहेत. पुर्व प्राथमिक विभाग मुख्य प्रवाहात आणले आहे. बालवाड्यांमध्ये समानता आली आहे. पुढच्या शिक्षणासाठी हे उपयोगी असून मुलांचा पाया पक्का होतो असे त्या म्हणाल्या. याला अनुसरुन आज शाळेत अंक, भाषा, कौशल्य आणि खेळ याचे प्रदर्शन तीन वर्गात लावण्यात आले होते.