डोंबिवली : जनसंपर्क दांडगा असेल तर कोणासमोर हात जोडायची तसेच पसरायची वेळ येणार नाही. शाखांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढलाच पाहिजे. पण जिथे शाखा नाही तिथे जनसंपर्कवाढीसाठी मनसेचा नाका हवा, असा मोलाचा सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाकरे सोमवारी डोंबिवली दौऱ्यावर आले होते. सर्वेश सभागृह येथे कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील आमदारांपासून ते शाखा अध्यक्ष अशा सर्व पदाधिकाऱ्यांची ठाकरे यांनी विशेष बैठक घेत त्यांना मार्गदर्शन केेले. साधारण १५ ते २० मिनिटे चाललेल्या बैठकीत ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना शिस्तीचे धडेही दिले. प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी माझ्यासाठी समान आहे.
आपापसातील हेवेदावे पक्षाच्या बाहेर ठेवा. ते खपवून घेतले जाणार नाहीत, असेही त्यांनी सुनावले. कुठल्या पदाची काय काय कामे आहेत याबाबत ठाकरे यांच्याकडून काही पदाधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. संबंधितांना योग्य प्रकारे उत्तर देता आले नाही. यावर कुठल्या पदाची कोणती जबाबदारी आहे, याबाबतही लवकरच पक्षाच्या वतीने कार्यशाळा घेतली जाईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढेही पक्षाकडून कार्यक्रम आखून जनसंपर्कवाढीवर भर दिला जाणार असल्याचेही त्यांच्याकडून लक्ष वेधले गेले. दरम्यान, या एकूणच बैठकीबाबत मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांच्याशी संपर्क साधला असता पदाधिकाऱ्यांची संबंधित बैठक गोपनीय होती. त्यामुळे मला त्याबाबत भाष्य करता येणार नाही, मात्र राजसाहेबांनी केलेले मार्गदर्शन आम्हा प्रत्येक पदाधिकाऱ्यासाठी मोलाचे असून, पुढील वाटचालीत ते हिताचे ठरेल, असे घरत म्हणाले.
२०० कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेशडोंबिवली विधानसभा, दिवा येथील काही राजकीय पक्षांतील २०० कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. यावेळी आमदार तथा नेते राजू पाटील, अविनाश अभ्यंकर, अविनाश जाधव, मनोज घरत, प्रकाश भोईर, सरोज भोईर आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
रोज रोज नाही... - शुक्रवारी, शनिवार, रविवार आणि सोमवार असे चार दिवस ठाकरे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. - मीरा-भाईंदर, अंबरनाथ आणि कल्याणमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे कौतुक केले. - तर भाजपला खडेबोल सुनावले होते. - ठाकरे यांच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनीही टोले लगावले होते. - दरम्यान, सोमवारी डोंबिवलीत पत्रकारांशी ठाकरे संवाद साधतील, अशी माहिती पक्षाकडून दिली गेली होती. - पाऊण तासात डोंबिवली दौरा आटपून निघणाऱ्या ठाकरे यांना संवादासाठी पत्रकारांनी घेरले असता ‘रोज रोज नाही’ असे बोलत त्यांनी तेथून नवी मुंबईकडे प्रयाण केले.