कल्याण : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने केडीएमसीच्या परिवहन सभापतीपदासह पूर्वप्राथमिक शिक्षण समिती, प्रभागक्षेत्र सभापतीपद आदी निवडणुका रखडल्या आहेत. त्यात आचारसंहितेत निवडणुका घ्याव्यात की नाही, या प्रस्तावात आयुक्त गोविंद बोडके यांनी तातडी नसल्याचे स्पष्ट केल्याने आचारसंहिता छाननी समितीने त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. चौथ्या टप्प्यातील कल्याण लोकसभेचे मतदान पार पडल्यामुळे आता तरी निवडणुका घेतल्या जातील का, असा सवाल सदस्य करत आहेत.
समितीमधील सहा सदस्यांचा २८ फेब्रुवारीला कार्यकाळ पूर्ण झाला. या रिक्त जागांसाठी १५ फेब्रुवारीला निवडणूक घेण्यात आली. आता सभापतीपदाच्या निवडणुकीचे वेध सदस्यांना लागले आहेत. त्याचबरोबर शिक्षण समिती आणि प्रभागक्षेत्र सभापतीपदाची निवडणूकही त्यानंतर होणार आहे. परिवहन समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती कोकण विभागीय आयुक्तांनी केली आहे. पण, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अन्य निवडणुका घेता येतात का, अशी शंका उपस्थित झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत माहिती घेण्यासाठी आचारसंहिता छाननी समितीकडे पत्र पाठवले होते. यात केडीएमसीतील अंतर्गत निवडणुकांसह उल्हासनगर महापालिकेतील स्थायी समिती सदस्य आणि कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष आदी निवडणुकांबाबतही मार्गदर्शन मागवण्यात आले होते. उल्हासनगर आणि बदलापूर येथील निवडणुका घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. पण, केडीएमसीतील निवडणुकांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी संबंधित प्रस्ताव छाननी समितीसमोर ठेवण्याइतपत तातडी नसल्याचे निदर्शनास आणले. त्यामुळे प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या छाननी समितीने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना २३ एप्रिलला कळवले आहे.
दरम्यान, राज्यातील मतदान संपल्याने आता तरी अंतर्गत निवडणुका लागतील का, असा सवाल सदस्य करत आहेत. एकीकडे आचारसंहिता काळातच मुंबई महापालिकेतील निवडणुका झाल्या. तसेच, बदलापूरमधील नगराध्यक्षाची निवडणूकही होत आहे. मग, आमच्याच निवडणुकांना विलंब का, याकडे त्यांच्याकडून लक्ष वेधले जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका आचारसंहितेत पार पडल्या. मुंबई महापालिकेतील अंतर्गत निवडणुकाही झाल्या आहेत. गुरुवारी बदलापूरची नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. केडीएमसीतील अंतर्गत निवडणुकांबाबत कोकण विभागीय आयुक्तांशी चर्चा झाली आहे. गुरुवारीही त्यांच्याशी संपर्क केला जाणार आहे. - गोपाळ लांडगे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख