लोकांना मदत करताना ‘तो’ झाला कोरोनाबाधित!घाबरू नका, बरे होता येते : डहाणूतील कोविडयोद्ध्याचे आवाहन; १० दिवसांच्या उपचारांनंतर परतले घरीअनिरुद्ध पाटीलबोर्डी : लोकांना मदत करता करता तो स्वत:च कोरोनाबाधित झाला. मात्र या आजारात खचून न जाता त्याने जिद्दीच्या जोरावर या जीवघेण्या आजारावर मात केली. कोरोनाग्रस्त रुग्ण समाजात आपले नाव समजू नये याची खबरदारी घेताना दिसतात, मात्र डहाणू तालुक्यातील आगर येथील संदेश आणि संजय या पाटील बंधूंनी याची तमा न बाळगता एक पाऊल पुढे येत, लोकांना ही बाब सांगितलीच, शिवाय या आजारातून बरे होता येते, घाबरून जाऊ नये, असा संदेश दिला आहे.डहाणू तालुक्यातील आगर येथील संदेश आणि संजय पाटील हे जुळे भाऊ सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यापैकी संदेश पाटील यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना बोईसर येथील टीमा रु ग्णालयात दाखल केले होते. दहा दिवस उपचार घेऊन ते घरी परतले असून या कोविडयोद्ध्याचे स्थानिकांनी स्वागत केले. या आजाराशी दोन हात करताना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.डहाणूतील आगर येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरच्या वस्तीत हे पाटील बंधू राहतात. ज्याप्रमाणे त्यांच्यात दिसण्यात साम्य आहे, तसे सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात. दरम्यान, संदेश पाटील यांची गेल्या ११ जुलै रोजी वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर बोईसर येथील टीमा हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचाराकरिता दाखल करण्यात आले. सोमवारी, २० जुलै रोजी उपचार घेऊन ते घरी आले. त्या वेळी स्थानिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.हे दोन्ही भाऊ मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमात सहभागी झाले. या काळात त्यांनी स्थलांतरित मजुरांना स्वखर्चाने घरी पोचवण्यासाठी पुढाकार घेतला, तर डहाणूबरोबरच चारोटी नाका येथून सुमारे तीनशे ते साडेतीनशे मजुरांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी मदत केली. गुजरात राज्यातून स्वजिल्ह्यात परतलेल्या आदिवासी खलाशांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना पाणी व इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योगदान दिले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात वादळसदृश स्थितीत शासनाच्या आवाहनानंतर समुद्र किनाºयालगतच्या वस्तीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या भोजनाची व निवाºयाची सोय केली. सामान्य आणि अत्यंत गरीब लोकांना शासनाच्या शिवभोजन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी डहाणू रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच शिवभोजन कक्ष सुरू करून दररोज सुमारे ४०० लोकांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून डहाणू नगरपालिका क्षेत्रामध्ये निर्जंतुक फवारणी करणे, कोरोना काळात लायन्स क्लबच्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबिरात संदेश पाटील यांनी स्वत: रक्तदान केले होते. कोरोनाच्या महामारीत स्वत:ची पर्वा न करणाºया कोरोना योद्ध्यांचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.अनेकांचे मानले आभारसोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना त्यांना या आजाराचा संसर्ग झाला. मात्र आता त्यांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या या लढाईत त्यांना सावटा येथील के.के. मिस्त्री हायस्कूलचे ट्रस्टी रमेश नहार, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक शैलेश राऊत यांनी मानसिक पाठिंबा दिल्याचे पाटील बंधूंनी सांगितले.
CoronaVirus News: लोकांना मदत करताना ‘तो’ झाला कोरोनाबाधित; १० दिवसांच्या उपचारांनंतर परतले घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 12:16 AM