अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : रोजगार देणाऱ्या कंपन्या गुजरातला जातात. तर मराठी पोरांना रोजगार मिळणार कुठून आता आपल्या पोरांना नोकरीसाठी महाराष्ट्र सोडून गुजरातला जावे लागलं, अशी टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी करत, भारतात ८३ टक्के लोक बेरोजगार आहे. भारताचा विकासदर ४ पेक्षा खाली जाईल आणि तो गेला तर आपली परिस्थिती ही पाकिस्तान आणि श्रीलंका पेक्षा वाईटच असेल असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. याचदरम्यान त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, बंगाल, बिहार सगळीकडेच नाराजी आहेत. तर मग येवढ्या जागा आणणार कुठून पाकिस्तान मधून का? अशी बोचरी टीका करत, मोदी सरकारला डिवचण्याचे काम आव्हाडांनी केले आहे. तर, गारपीटनंतर शरद पवार एकटेच शेतकऱ्यांच्यासाठी धावून जातात. बाकी सगळेच राजकारण करतात असेही ते म्हणाले.
ठाण्यात सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाडांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या आधी अनेक रोजगार मेळावे लागतात, ऑन ट्रेनी आणि अप्रेंटीसमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकत नाही. असे सांगितले जाते. यावरून लोकांना येड बनवणं हेच यांचं काम असल्याचे दिसत आहे अशी टीकाही त्यांनी केली. तसेच पहिल्यांदा निवडून आल्यानंतर लोकांना आशा दाखवल्या. त्याचे काय झालं ते सांगा. तसेच दहा वर्षात दिलेली वचने किती पूर्ण केली ते सांगा. असा सवाल यावेळी त्यांनी केला आहे.
दहशत निर्माण व्हावी यासाठी गँगचा वापर - आव्हाड
गुंडांचे फोन येतात. हे शंभर टक्के खरं आहे. ते गुंड कोण आहेत, कोणत्या गॅंगचे आहेत,त्यांच्यावर किती मर्डर केसेस आहेत. किती गुन्हे आहेत याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. दहशत निर्माण व्हावी यासाठी गँगचा वापर केला जात आहे . आमदार रोहित पवार जे बोलले त्यात एक शब्दही खोटा नाही. असेही आव्हाडांनी यावेळी सांगितले.
गोडावूनवर जी कारवाई झाली ती १०० टक्के चुकीची आहे. उच्च न्यायालयाची स्टे आॅर्डर असतांना देखील कारवाई झाली आहे. त्या विरोधात मी कोर्टात गेलो आहे. दोन ते तीन दिवसात त्या संदर्भातील निर्णय येणे अपेक्षित असल्याचे मत भिवंडी लोकसभा मतदार संघाचे शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हात्रे हे जितेंद्र आव्हाड यांची भेट घेण्यासाठी ठाण्यात आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तीन दिवसापूर्वी देखील एक रस्ता तोडला, सीसी असून देखील वन खात्याकडून कारवाई केली गेली. अधिकाºयांवर देखील दबाव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भिवंडी शरद पवार आणि उध्दव ठाकरे मिळून तीन सभा घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर यावेळी कपील पाटील यांनी भिवंडीत केवळ टक्केवारीचे राजकारण केले असून एवढ्या वर्षात त्यांनी येथील लोकांसाठी काय केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. निलेश सांबरे यांनी लढण्याचे संकेत दिले आहेत, मात्र त्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही. मात्र अशा परिस्थितीत सर्वांना एकत्र होणे गरजेचे असल्याचे सांगत ही एकाच विचारांची लढाई असल्याचे त्यांनी सांगितले.