मीरारोड - मीरारोड मध्ये रिक्षा चालक मीटर प्रमाणे भाडे घेत असताना भाईंदर मध्ये आजही रिक्षा चालक हे कायदे - नियमांना तसेच प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांना न जुमानता मीटर प्रमाणे भाडे घेण्यास नकार देत आहेत . मीटर प्रमाणे भाडे कमी होत असल्याने रिक्षा चालक मात्र मनमानी स्पेशल भाडे नावाखाली प्रवाश्यांची लूट करत आहेत .
कायद्याने मीटर प्रमाणे भाडे स्वीकारणे रिक्षा चालकांना बंधनकारक आहे . रिक्षा चालकाने कोणत्याही प्रवाशास त्याच्या इच्छित स्थळी सोडले पाहिजे . मीटर प्रमाणे भाडे न स्वीकारणाऱ्या रिक्षा चालकावर प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस कारवाई यांनी सातत्याने कारवाई करणे आवश्यक आहे . त्यांनी स्वतःहून अश्या प्रकारांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे . परंतु ह्या दोन्ही यंत्रणा जाणीवपूर्वक मीटर प्रमाणे भाडे याची अमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आले आहेत . त्यामुळे रिक्षा चालकांच्या मनमानी भाडे वसुलीला ह्या यंत्रणांची मोकळीक असण्या मागे अर्थपूर्ण कारण नाकारता येत नाही .
सध्या मीटर प्रमाणे किमान भाडे हे २१ रुपये इतके आहे . परंतु भाईंदर मध्ये मात्र पूर्व - पश्चिम तसेच थेट मुर्धा ते उत्तन - पाली पर्यंत कुठेही रिक्षा चालक हे मीटर प्रमाणे भाडे घेऊन जायला तयार नाहीत . या भागातील रिक्षा चालक हे सर्रास मीटर प्रमाणे भाडे नेण्यास नकार देतात. भाईंदर मध्ये मीटर पद्धतच नसल्याचे मोठ्या ठसक्यात सांगून सेपरेट जायचे तर स्पेशल भाडे म्हणून वाट्टेल ती रक्कम सांगून प्रवाश्यांची लूट करतात . प्रवासी देखील वाद नको म्हणून नाईलाजाने मागेल ते भाडे देऊन प्रवास करतात . किमान भाडे २१ रुपये असताना स्पेशल भाडे सांगून किमान ३० ते ४५ रुपये उकळले जातात .
भाईंदर स्थानक पासून नवघर - गोडदेव किंवा भाईंदर पोलीस ठाणे वा फाटक जायचे म्हटल्यास स्पेशल भाडे म्हणून २१ ऐवजी ३० रुपये घेतले जातात . भाईंदर पूर्व वरून भाईंदर पश्चिमेस जायचे सांगितले तर स्पेशल भाडे म्हणून थेट ६० रुपये वा त्यापेक्षा जास्त सांगितले जातात . मॅक्सस पर्यंत थेट ४५ ते ५० रुपये सांगतात . उत्तन ला तर १५० रुपयेच्या आसपास भाडे घेतले जाते . भाईंदर पूर्वेला क्रीडा संकुल व इंद्रलोक पर्यंत ४५ ते ६० रुपये घेतले जातात .
अश्याच प्रकारे अंतरा नुसार मनमानी शुल्क वसूल करून प्रवाश्यांची लूट चालवली असताना ह्या प्रकरणी ठोस कारवाई मात्र होत नाही . आरटीओ, वाहतूक पोलीस आदीं कडून स्वतःहून ठोस कारवाई केली जात नसतानाच दुसरीकडे राजकारणी आणि लोकप्रतिनिधी देखील या प्रश्नी मूग गिळून बसतात . जेणे करून मनमानी भाड्याच्या वसुली विरोधात प्रवासी हतबलता व्यक्त करतात . दुसरीकडे काही रिक्षा चालकांना विचारणा केली असता मीटर प्रमाणे रिक्षा चालवण्यास आमची तयारी आहे . पण रिक्षा संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांचा आणि काही रिक्षा चालकांना मीटर प्रमाणे रिक्षा चालवण्यास विरोध असल्याचे सांगितले जाते. परंतु मीटर प्रमाणे चला सांगितले तर रिक्षा चालक मात्र सरळ नकार देतात