पहाटे पहाटे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या झालेल्या शपथविधीच्या आठवणींनी पुणेकर चंद्रकांतदादा पाटलांच्या पोटात मुरडा मारतो. बारामतीकर अजितदादांसोबत जर फडणवीस यांचा यदाकदाचित पुन्हा शपथविधी झाला तर आपल्याला कोल्हापुरात तांबडा-पांढरा रस्सा ओरपून तृप्तीची ढेकर देत बसण्याखेरीज काही काम उरणार नाही, अशी त्यांची पक्की धारणा असल्याने त्यांनी या पहाटेच्या सुंदर स्वप्नात बिब्बा घालण्याची युक्ती काढली. प्रदेश भाजप कार्यकारिणीने अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारा ठराव करण्याची खेळी खेळली. अर्थात महाराष्ट्रात सीबीआयला सरकारने दरवाजे बंद केल्याने अशी चौकशी मुळात होणार का? समजा अगदी चौकशी झालीच तर सिंचनाच्या चौकशीत जशी क्लिन चीट दिली तशी ती पुन्हा देता येईल, असा फडणवीस यांना पक्का विश्वास आहे.
...................
पायधूळ का झाडली?
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन बीडीडी चाळीतील पोलिसांच्या घरासंबंधीच्या प्रश्नाबाबत चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण येणे स्वाभाविक आहे. कर्करोग रुग्णांच्या नातलगांकरिता म्हाडाच्या सदनिका उपलब्ध करून देण्याच्या आव्हाड यांच्या योजनेबाबत शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या तक्रारीवरून मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने आव्हाड दु:खी झाले असल्याची चर्चा आहे. (मुंब्रा येथे कोविड रुग्णालयाला आग लागल्यावर पालकमंत्र्यांची वाट न पाहता मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून मदतीची घोषणा करून मोकळ्या होणाऱ्या आव्हाडांकरिता हा धक्काच होता) त्यामुळे आव्हाड यांनी ही भेट घेतली, अशी चर्चा आहे. पत्रावाला चाळीचा विकास म्हाडा करीत असल्याने या योजनेतील भाजपशी संबंधित विकासकाबाबतही चर्चा होती, अशी शंका काहींच्या मनात आली. ज्या दिवशी अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याचा ठराव भाजप मंजूर करते त्याच दिवशी ही भेट होण्यामुळे आव्हाड यांनी आपली बाजू साफ करण्याकरिता पायधूळ झाडली, अशीही शंका घेतली गेली. आव्हाड-फडणवीस यांची भेट हा चर्वितचर्वणाचा विषय न झाला तर नवल.
..................
नाल्यातली अंघोळ
उत्तर मध्य मुंबईतील एका कार्यसम्राटाने महापालिकेच्या एका कंत्राटदाराला अलीकडेच नाल्याच्या पाण्याने अंघोळ घातली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेक शंकाकुशंकांना ऊत आला. वर्षभरात तीन-चार वेळा साफ केला जाणारा हा ‘विशेष नाला’ तुंबलाच कसा, असा प्रश्न स्थानिकांना सतावत होता. या नाल्यात शेजारच्या एका कारखान्याचे सांडपाणी (विनापरवाना) सोडले जात आहे. हा प्रकार कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून नाला कायमस्वरूपी वाहत ठेवला जातो. त्या मोबदल्यात संबंधितांना टक्केवारी दिली जाते. गेल्या काही महिन्यांपासून वाटा न मिळाल्याने कंत्राटदार दु:खी होता. चौकशी केली असता आपला वाटा भलत्याच्या खिशात जात असल्याचे त्याला समजले. त्या व्यक्तीला धडा शिकवण्याकरिता हा ‘विशेष नाला’ पहिल्याच पावसात तुंबेल, याची पुरेपूर काळजी कंत्राटदाराने घेतली. ‘विशेष नाला’ तुंबून पाणी रस्त्यावर आल्याने रहिवाशांनी आरडाओरड सुरू केली. यामुळे पारा चढलेल्या कार्यसम्राटाने कंत्राटदाराला उचलून आणून नाल्याच्या कडेला बसवले आणि ‘विशेष नाल्या’तील पाण्याने अंघोळ घातली. कंत्राटदारही बेरकी, त्याने एवढे होऊनही ‘विशेष नाला’ साफ केला नाहीच. अखेर कार्यसम्राटाला स्वत:च्या माणसांकडून ‘विशेष नाला’ साफ करून घ्यावा लागला.
.........................
प्रतापचं पत्र हरवलं (की दाबलं)
लहान मुले ‘मामाचं पत्र हरवलं’ असा खेळ खेळतात. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्येही असाच ‘पोरखेळ’ सुरू आहे. शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी त्यांना ईडीकडून होणाऱ्या विनाकारण त्रासाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. त्यामध्ये हा ससेमिरा टाळायचा तर भाजपसोबत जायला हवे, असे त्यांनी सुचवले. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात ठाकरे आपल्याला होणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या जाचाबद्दल बोलतील, अशी सरनाईक यांची अपेक्षा होती. मात्र, ठाकरे यांच्या भाषणात त्याचा उल्लेखही नव्हता. त्यामुळे सरनाईक अस्वस्थ झाले. लगोलग सरनाईक यांचे पत्र मीडियाकडे पोहोचले. टीव्हीच्या पडद्यावर जेव्हा पत्र पाहिले तेव्हा ठाकरे म्हणाले की, प्रतापने असे पत्र मला लिहिले आहे? तर ते कुठे आहे? मग पत्राची शोधाशोध करून ते ठाकरे यांच्या हातात दिले गेले. इतके महत्त्वाचे पत्र हरवले की दाबून ठेवले?
................
वाचली