ऑक्सिजन आपल्याकरिता किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव कोरोनाने आपल्याला करून दिली; परंतु राजकीय नेत्यांचे केवळ ऑक्सिजनने भागत नाही. त्यांना त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांकरिता पुरेसा निधी मिळाला नाही, तरी त्यांची कारकीर्द धापा टाकू लागते. ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी बोलताना सरनाईक यांनी उपवन तलावाच्या सुशोभीकरणाचे काम निधीअभावी अर्धवट पडले असल्याकडे ठाकरे यांचे लक्ष वेधले. मीरा रोड-भाईंदर तसेच ठाण्यात सरनाईक यांच्या प्रयत्नाने सुरू झालेली काही पुलांची कामे निधी न मिळाल्याने रखडली आहेत. सरनाईक यांनी निधीकरिता कंठशोष केल्यानंतर ठाण्याचे पालकमंत्री अर्थात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे बोलायला उभे राहिले. साहेब (उद्धव ठाकरे) तुम्ही समोर आल्यावर प्रताप सारखे निधी मागतात; पण सगळ्या आमदारांमध्ये सर्वाधिक निधी प्रताप यांनाच मिळाल्याचा खुलासा शिंदे यांनी केला. ठाण्यातील शिंदे-सरनाईक मैत्री पक्की ठावूक असल्याने उद्धव ठाकरे म्हणाले की, एकनाथराव, सरनाईक हे चांगल्या कामाकरिता निधी मागत असून, काम चांगले असेल तर आपण हातचे राखून निधी देत नाही. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे ब्रीद आहे. मागे सरनाईक यांनी महाविकास आघाडीला तिलांजली देऊन भाजपसोबत जाण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला होता; पण ते पत्र दसरा मेळाव्यापर्यंत उद्धव यांच्यापर्यंत पोहोचले नव्हते. त्यामुळे आता सल्ले, मागणं हे सर्वांसमक्ष करण्याचे बहुदा सरनाईक यांनी ठरवले आहे. याच कार्यक्रमात संजय राऊत यांनी सरनाईक हे ठाण्याची ऑक्सिजनची गरज भागवत असल्याचा उल्लेख केला. तोच धागा पकडून सरनाईक यांनी मला जेव्हा (राजकीय) ऑक्सिजनची गरज होती तेव्हा तो राऊत यांनी पुरवल्याचा उल्लेख केला. (सरनाईक यांची ही प्रांजळ कबुली की, स्वपक्षीय सहकाऱ्यांना चिमटा, याची कुजबुज रंगणे स्वाभाविक आहे.) राऊत यांच्या राजकीय ऑक्सिजनमुळे आज मी इथे आहे म्हणणाऱ्या सरनाईक यांना निधीचा ऑक्सिजन मंजूर होणार का? पत्रासारखी निधीच्या मागणीची परवड होऊ नये, हीच अपेक्षा
............................ रंगरंगोटीने उठला दरबार
गणपती जवळ आल्याने घरोघरी साफसफाई, सजावट, रंगरंगोटीची कामे सुरू झाली आहेत. मुंबईच्या प्रथम नागरिक किशोरी पेडणेकर यांच्या दक्षिण मुंबईतील घरात रंगरंगोटीचे काम सुरू झाले आहे. रंगकाम म्हटले की, कराकरा भिंती घासण्याचा अंगावर शहारे आणणारा आवाज, नाकातोंडात जाणारी धूळ आणि रसायनांचा उग्र दर्प हे सारे ओघाने आलेच. किशोरीताईंच्या घरी कार्यकर्त्यांचा, अडल्यानडलेल्यांचा राबता असतो. रंगकाम करणाऱ्यांनी बघताबघता बंगल्याचा ताबा घेतला. रंगाचे डबे, भिंतीला गिलावा करण्याची पुट्टी, ब्रश यांनी पाहता पाहता किशोरीताईंना घरात पाऊल ठेवायलाही जागा ठेवली नाही. नाकातोंडावर फडकी गुंडाळलेल्या कामगारांनी जणू ताईंच्या घराचा ताबा घेतला. सुरुवातीचे एक-दोन दिवस काही कार्यकर्ते ताईंकडे आले; पण घराची (व किशोरीताईंची) अवस्था पाहून येणे बंद झाले. आता किशोरीताई देखील हल्ली दौऱ्यावर असतात. रंगरंगोटीने त्यांच्या बंगल्यावर भरणारा कार्यकर्ते, अभ्यागतांचा दरबार तात्पुरता उठलाय आणि त्याची महापालिकेत कुजबुज सुरू आहे.
.................
साहेब आणि सबुरी ‘श्रद्धा आणि सबुरी’ यावर विश्वास ठेवून अनेकजण आपल्या जीवनात वाटचाल करतात. या दोन गोष्टी विनाअपघात आपल्याला मार्गक्रमण करण्यास साथ देतील, असे अनेकांना वाटते. सध्या परिवहन खाते वेगवेगळ्या कारणांमुळे गाजत आहे. ‘श्रद्धा व सबुरी’ या दोन परवलीच्या शब्दांमुळेच या खात्याचे मंत्री अनिल परब यांचे सरकारच्या ब्रेक व एक्सलेटरवर नियंत्रण आहे, हे नारायण राणे यांच्या अटकेच्या निमित्ताने कॅमेराबंद झाले. परिवहन विभागातील ताडदेव, वडाळा, अंधेरी, बोरीवली या कार्यालयांतील मोटार वाहन निरीक्षक, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या अलीकडेच घाऊक बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे या कार्यालयात घिरट्या घालणारे एजंट मात्र सध्या ‘साहेब आणि सबुरी’ याचा अवलंब करीत आहेत. साहेबांच्या आवडीनिवडी काय? साहेब ब्लॅक टी घेतात की मलई मारके चहा घेतात? साहेबांच्या मूडचा गिअर कधी कितवा पडतो? साहेबांची गाडी किती ॲव्हरेज घेते? साहेबांच्या टोलचा रेट काय? या व अशा नानाविध प्रश्नांचा वेध घेत आहेत.
.............
पॉलिटिकल टूरिझम
ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर माथेफिरू फेरीवाल्याने हल्ला केला नसता तर कदाचित राजकीय नेत्यांच्या त्या खिजगणतीतही नसत्या. कर्तव्य बजावताना त्यांच्यावर हल्ला होऊन त्या जखमी होताच पिंपळे यांना मीडियाने अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधातील लढवय्या अधिकाऱ्यांचे सिम्बॉल बनवले. अर्थात त्यांचे धैर्य वाखाणण्याजोगे आहेच; परंतु लागलीच पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याच्या निमित्ताने पॉलिटिकल टूरिझम सुरू झाले. नेते आपल्या समर्थकांसह पिंपळे यांच्या चौकशीला जातात. काही नेत्यांच्या तोंडावर मास्क नव्हते. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला भेटताना तरी मास्क घालणे बंधनकारक असलेच पाहिजे. पिंपळे यांना भेटल्यावर कुणी प्रशासनाला, सरकारला दुषणे देतोय तर कुणी परप्रांतीय फेरीवाल्यांच्या विरोधात डरकाळ्या फोडतोय. पिंपळे यांच्या निमित्ताने सुरू असलेल्या राजकारणाचा त्यांना किती मनस्ताप होत असेल, याची कुणालाच फिकीर नाही.
...........