बाळासाहेबांची वाणी
एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेल्या कृपाशंकर सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम रद्द केल्यानंतर या निर्णयाच्या प्रचाराकरिता कृपाभय्या देशभर दौरा करीत होते, याचा उलगडा त्यांच्या प्रवेशावेळी झाला. ३७० रद्द झाल्यावर काश्मीरमध्ये अन्य राज्यातील मंडळींना जमीन खरेदी करता येईल, असे सांगितले जात होते. मात्र कृपाभय्या यांच्या दौऱ्यानंतर आता काश्मीरमध्ये पाणीपुरी-भेळपुरीच्या गाड्या लागतील व मुंबईतून काश्मिरात गेलेल्यांना दल लेकच्या किनाऱ्यावर बसून ‘भय्याजी, दोन शेवपुरी, एक रगडा’ अशी हाक देता येईल याची निश्चिती झाली. कृपाशंकर हे काँग्रेसमध्ये असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांच्यावर मनस्वी प्रेम होते. अनेकदा जाहीर सभेत ‘मराठी माणसा तू जागा राहिला नाही तर एक दिवस हा कृपाशंकर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल’, अशी भीती ते घालत. मराठी माणूस अनेक रात्री झोपला नाही म्हणून किंवा बाळासाहेबांची वाणी खरी व्हावी ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींची इच्छा नसल्याने कृपाशंकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून कृपाशंकर यांना भाजपने पोटाशी घेतले आहे हे वेगळे सांगायला नको. (काँग्रेस माझी आई आहे तर भाजप माझी मावशी आहे. मराठीत आपण माय मरो, पण मावशी जगो, असे म्हणतो असे आता कृपाभय्या सांगतील.) उत्तर भारतीय मतदारांची व्होटबँक कृपाशंकर यांनी मुंबईत ‘आयात’ केली. तीच भाजपला हवी आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता जर कृपाशंकर यांनी घालवली आणि मोदी-शहांनी २०२४ मध्ये बाळासाहेबांची वाणी खरी केली तर?
...............
मामांपुढील पेच
राजकारणात अनेकदा पदांचे गाजर दाखवून मामा बनवले जाते. मात्र भिवंडीत कपिल पाटील यांना अचानक केंद्रीय राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागल्याने एक मामा भलत्याच पेचात सापडले आहेत. बाळ्यामामा म्हात्रे हे भिवंडीतील शिवसेनेचा चेहरा. कपिल पाटील आणि बाळ्यामामा म्हात्रे यांचा छत्तीसचा आकडा. पाटील यांना लोकसभेचे उत्तुंग राजकीय यश लाभले तर बाळ्यामामा यांचे राजकारण जिल्हा परिषदेच्या पुढे गेले नाही. कपिल पाटील यांनी राज्यात युती असताना एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून अनेक निर्णय घेतल्याने बाळ्यामामा एकाकी पडले. काही दिवसांपूर्वी बाळ्यामामांनी शिवसेनेला रामराम केला. आता अचानक कपिल पाटील यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपद सोपवल्याने भिवंडीत स्थानिक पातळीवर भाजपचा मुकाबला करील, असा नेता शिवसेनेकडे नाही. त्यामुळे आता शिवसेना बाळ्यामामांना पुन्हा शिवबंधन बांधायला सांगणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. कपिल पाटील यांचा लोकसभा मतदारसंघ हा मूळचा काँग्रेसचा असून तेथे मुस्लिम मतांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिवसेनेला रामराम केल्यानंतर बाळ्यामामांनी काँग्रेसमध्ये यावे, अशी काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा आहे. एकीकडे पाटील यांच्याशी दररोज भिवंडीच्या मातीत दोन हात करण्याची संधी आहे तर दुसरीकडे निवडणूक रिंगणात लढायची संधी आहे. आता बाळ्यामामा कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
.................
पंचतारांकित उपचार घेवा रे
मीरा-भाईंदर महापालिकेतील बनावट यूएलसी प्रमाणपत्राच्या घोटाळ्यात नगररचना विभागातील बड्या धेंडांना पोलिसांनी अटक केली आहे. मुळात २०१६ मध्ये म्हणजे परमबीर सिंह ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना या घोटाळ्यात सर्वप्रथम अटक केली गेली. कालांतराने कारवाई बासनात गुंडाळली गेली. परमबीर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांचा आरोप केल्यानंतर परमबीर यांच्या ठाण्यातील आयुक्तपदाच्या कारकिर्दीतील अचानक तपास थांबलेल्या या यूएलसी प्रमाणपत्र घोटाळ्याची नव्याने चौकशी सुरू झाली. यापूर्वी साक्षीदार असलेले काही बडे अधिकारी हेच आरोपी म्हणून अटक केले गेले. पोलिसांनी अटक केल्यानंतर अशा बड्या धेंडांचे हृदय असहकार पुकारते हे आता सर्वसामान्यांना कळून चुकलेय. पोलीस कोठडीतील कुबट वासापेक्षा हॉस्पिटलमधील स्पिरिट-फिनाईलचा ‘सुवास’ उत्तम अशी समजूत घालून बडी धेंडे हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. मुळात अशा आरोपी असलेल्या बड्यांना सरकारी इस्पितळात दाखल करायला हवे. परंतु यूएलसी प्रमाणपत्राच्या घोटाळ्यात अटक झालेला हा बडा अधिकारी ठाण्यातील एका पंचतारांकित हॉस्पिटलमधील एक्झिक्युटिव्ह क्लास कक्षात आराम फर्मावत आहे. त्याची ही बडदास्त ठेवण्यात सध्या एकमेकांची तोंडे न पाहणाऱ्या पक्षाच्या नेत्यांची ‘युती’ असल्याची चर्चा आहे हे विशेष.
...............
वाचली